

इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल. कोहलीच्या या निर्णयामुळे त्याचे सर्व चाहते निराश झाले आहेत. पण तो भारत - पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी नंतरच्या उर्वरीत आयपीएल सामन्यांमध्ये आरसीबीचे कर्णधारपद भूषवताना दिसण्याची शक्यता आहे. याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
किंग कोहली खरंच पुन्हा नेतृत्व करेल का? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या मध्यात कर्णधार बदल करणार आहे का? खरंतर, हे प्रश्न आणि शक्यता समोर येत आहेत कारण बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
आरसीबीचापुढील सामना केकेआर विरुद्ध आहे. पण या सामन्यात दुखापतग्रस्त पाटीदार खेळू शकला नाही तर मग संघाचे नेतृत्व कोण करेल याची चिंता फ्रांचायझीला पडली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार पदासाठी स्टार खेळाडू विराट कोहली याचे नाव पुढे येत आहे.
भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबलेला आयपीएल 2025 चा हंगाम 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. पण अशा महत्त्वाच्या सामान्यापूर्वी विद्यमान कर्णधार रजत पाटीदारची दुखापत आरसीबीसाठी समस्या बनली आहे.
रिपोर्ट्सनुसार, पाटीदार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. आता त्याच्या जागी कोण कर्णधार होईल, हा एक मोठा प्रश्न बनला आहे. सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान रजत पाटीदारच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्याला बरे होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.
कोहली KKR विरुद्ध कर्णधारपद भूषवू शकेल का? सध्या, उत्तर फक्त 'नाही' असे दिसते. याचेही एक कारण आहे. खरंतर, हंगाम स्थगित होण्यापूर्वी, आरसीबीला एलएसजी विरुद्ध एक सामना खेळायचा होता. त्या सामन्यात पाटीदार खेळणार नव्हता. द इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, एलएसजीविरुद्ध रजत पाटीदारच्या जागी विकेटकीपर-फलंदाज जितेश शर्माला संघाचे नेतृत्व देण्याचा निर्णय झाला होता. आता जर रजत पाटीदार केकेआरविरुद्ध खेळला नाही तर कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा जितेशकडे दिली जाऊ शकते. तथापि, अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले असून ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. तर केकेआर संघ 12 सामन्यांत 5 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलचे हे चित्र पाहता आरसीबी प्लेऑफच्या अगदी जवळ आहे. जर त्यांनी पुढच्या सामन्यात पुन्हा एकदा कोलकात्याला पराभवाची धूळ चारली तर संघ प्लेऑफसाठी नक्कीच पात्र ठरेल.