

Mukul Choudhary IPL 2026: आयपीएल २०२६ च्या १५ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट राडयर्सचा ३ विकेट्स राखून पराभव करत २ गुणांची कमाई केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने २० षटाकत १८१ धावा केल्या होत्या. हे आव्हान लखनौने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो लखनौचा मुकूल चौधरी... त्याने २७ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.
शेवटच्या षटकात दोन षटकार मारत स्टाईलमध्ये लखनौला सामना जिंकून देणाऱ्या मुकूलबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लखनौचे कोच जस्टीन लँगर मुकूल चौधरीबाबत एक भविष्यवाणी करताना दिसत आहेत. ही भविष्यवाणी मुकूलने केकेआरविरूद्धच्या सामन्यात सत्यात उतरवून दाखवली. त्याने अनेक केकेआर फॅन्सचे ह्रदय तोडले.
एका व्हायरल व्हिडिओत जस्टीन लँगर म्हणतात की मुकूल चौधरी हा भारतातील सहाव्या आणि सातव्या क्रमांकाचा सर्वात भीतीदायक फलंदाज होऊ शकतो. मुकूलने ही भविष्यवाणी आयपीएल २०२६ च्या १५ व्या सामन्यात खरी करून दाखवली.
या व्हिडिओत सरावावेळी लँगर मुकूलला सांगतो की, पुढच्या चार महिन्यात मी तुला भारतातील सर्वात सहा सात क्रमांकावरचा सर्वात भीतीदायक फलंदाज करणार आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर केकेआरच्या १८२ धावांचे आव्हान पार करताना लखनौ सुपर जायंट्सची १६ व्या षटकात अवस्था ७ बाद १२८ धावा अशी झाली होती. हा सामना केकेआरच्या खिशात होता. मात्र मुकूलने होत्याचं नव्हतं केलं. २१ वर्षाच्या मुकूलने २७ चेंडूत नाबाद ५४ धावा ठोकल्या. त्याने शेवटच्या १९ चेंडूत ५२ धावा ठोकल्या.
या धडाकेबाज खेळीमुळं लखनौने सामना ३ विकेट्सनी जिंकला. त्याचा धडाकेबाज अॅप्रोचमुळं जवळपास गमावलेला सामना लखनौने जिंकला. यंदाच्या हंगामातील हा एक सर्वात स्मरणीय रन चेस ठरणार यात काही शंका नाही.
सामन्यानंतर मुकूलने तो या धडाकेबाज खेळीवेळी काय विचार करत होता हे सांगितलं. तो म्हणाला, माझा प्लॅन हा शेवटपर्यंत खेळण्याचा होता. मला माझ्यावर विश्वास होता की जर मी क्रीजवर थांबलो तर मी माझ्या संघाला विजयापर्यंत पोहचवू शकतो. दबाव असतो मात्र मी दबावावर नाही तर फक्त संधीवर लक्ष केंद्रित केलं.
तो म्हणाला, 'माझा प्रवास हा माझ्या जन्मापूर्वीपासूनच सुरू झाला. माझ्या वडिलांचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते.' मुकूल हा झुलझुनू येथून येतो. त्याने १२ - १३ व्या वर्षी खूप कमी संसाधनात क्रिकेट खेलण्यास सुरूवात केली. त्याने सिकर इथं सराव सुरू केला नंतर तो जैपूरमध्ये शिफ्ट झाला. नंतर त्याने गुरूग्राममध्ये आपले टी २० स्कील्स डेव्हलप केले.
मुकूल म्हणतो जर चेंडू माझ्या टप्प्यात आला तर मी तो मारणारच. मी कायम याच पद्धतीनं खेळतो.' त्याच्या या आक्रमक प्रवृत्तीचे दर्शन केकेआरविरूद्धच्या शेवटच्या षटकात दिसले. तो योग्य चेंडूची धौऱ्याने वाट पाहत होता. जरी गोलंदाजाने चार चांगले चेंडू टाकले तरी मला माहिती होतं की तो एक चेंडू तरी माझ्या झोनमध्ये टाकणारच.'