

KKR Loss Explained: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. जिंकलेला सामना हातातून निसटल्याने KKR ला मोठा धक्का बसला, तर LSG ने अविश्वसनीय पुनरागमन करत विजय खेचून आणला. या सामन्याचा खरा हिरो ठरला मुकुल चौधरी, ज्याच्या नाबाद अर्धशतकामुळे लखनऊने अशक्य वाटणारा विजय मिळवला.
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात KKR ने प्रथम फलंदाजी करत 181 धावांचा टप्पा गाठला. हा स्कोर बचाव करण्यासाठी पुरेसा वाटत असतानाच लखनऊची अवस्था 7 बाद 128 अशी झाली होती. मात्र इथून पुढे मुकुल चौधरीने जबरदस्त खेळी करत सामना पूर्णपणे फिरवला.
KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे सामना हरल्यानंतर निराश दिसला, पण त्याने पराभवाचे खापर आपल्या संघावर न फोडता मुकुलच्या खेळीचे कौतुक केले. “हा पराभव पचवणं कठीण आहे, पण आमच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली. मुकुलची खेळी निर्णायक ठरली. अशा सामन्यांमध्ये फार चुका शोधता येत नाहीत, त्याला श्रेय द्यायलाच हवं,” असं रहाणे म्हणाला.
मुकुल आणि आवेश खान यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीमुळे सामना जिंकला. विशेष म्हणजे या भागीदारीत आवेश खानचा फक्त 1 धावांचा वाटा होता, उर्वरित सगळी जबाबदारी मुकुलने एकहाती सांभाळली.
रहाणेने आपल्या गोलंदाजांचंही कौतुक करत सांगितलं की, “या पिचवर 180-185 धावा चांगल्या होत्या. आमच्या गोलंदाजांनीही चांगलं काम केलं. पण लखनऊच्या फलंदाजांनी ज्या प्रकारे खेळ केला, त्यांना त्याचं श्रेय द्यायला हवं.”
दुसरीकडे, सामन्यानंतर मुकुल चौधरीने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं की त्यांचा मुलगा क्रिकेटर व्हावा. आर्थिक परिस्थिती फार चांगली नसतानाही त्याने 12-13 वर्षांचा असताना क्रिकेट सुरू केलं. झुंझुनूमध्ये योग्य सुविधा नसल्याने तो जयपूरला गेला आणि पुढे T20 क्रिकेटच्या संधी पाहून गुरुग्राममध्ये जाऊन मेहनत घेतली.
एकूणच, हा सामना केवळ एका विजय-पराभवाची कहाणी नव्हती, तर संघर्ष, आत्मविश्वास आणि संधीचं सोनं कसं करायचं याचं जिवंत उदाहरण होतं. मुकुल चौधरीच्या खेळीने केवळ सामना जिंकला नाही, तर त्याचं नावही क्रिकेटविश्वात ठळकपणे उमटलं आहे.