

JioHotstar bags digital rights of India vs England test series
जिओ-हॉटस्टारने (JioHotstar) इंग्लंड आणि भारत यांच्यातील आगामी कसोटी मालिकेचे विशेष डिजिटल प्रसारण हक्क मिळवले आहेत. क्रिकबझ (Cricbuzz)ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इंग्लंडविरुद्ध भारत यांच्यातील आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे डिजिटल प्रसारण हक्क JioHotstar ने मिळवले आहेत. ही मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार JioHotstar ने Sony Entertainment Network (Culver Max Entertainment Pvt. Ltd.) कडून डिजिटल हक्क उपपरवाना कराराद्वारे प्राप्त केले आहेत.
या करारानुसार, Sony Sports Network कडे टीव्ही प्रसारणाचे हक्क कायम राहतील, तर JioHotstar प्लॅटफॉर्मवर सर्व सामने थेट पाहता येतील. अशाप्रकारे भारतीय क्रिकेट चाहत्यांना डिजिटल आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमांद्वारे सामने पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. या मालिकेचे सामने JioHotstar अॅप किंवा वेबसाइटवर थेट पाहता येतील, तर टीव्हीवर Sony Sports चॅनेल्सवर प्रसारित होतील.
JioHotstar ने यापूर्वी ICC स्पर्धा, IPL आणि भारताच्या घरच्या मालिकांचे डिजिटल हक्क पटकावले आहेत. या नवीन करारामुळे JioHotstar भारतीय क्रिकेटच्या डिजिटल प्रसारण क्षेत्रात आणखी मजबूत स्थान मिळवले आहे.
गेल्या महिन्यापासून या दोन नेटवर्क्समध्ये चर्चा सुरू होती. अखेर ही चर्चा सफल झाली आणि करारावर शिक्कामोर्तब झाला. सोनीने सामन्यांचे डिजिटल स्ट्रीमिंगचे उप-परवाने देण्यास सहमती दर्शवली. परंतु मालिकेचे लिनियर प्रसारण हक्क त्यांनी स्वतःकडे ठेवले.
मालिकेतील इतर चार कसोटी सामने बर्मिंगहम (2 जुलैपासून), लॉर्ड्स (10 जुलैपासून), मँचेस्टर (23 जुलैपासून) आणि शेवटी द ओव्हल (31 जुलैपासून) येथे खेळले जातील.
असे समजते की, सोनी आणि Jio Star यांच्यातील सध्याचा करार पुढील वर्षीच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेपर्यंत विस्तारित आहे. 2026 च्या उन्हाळ्यात भारत इंग्लंडमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे, आणि Jio Star हे आठ सामनेही प्रसारित करेल.
सोनीने गेल्या वर्षी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) हक्क आठ वर्षांसाठी मिळवले होते. हा करार 2031 पर्यंत आहे. यामुळे त्यांना भारतातील सर्व इंग्लंड क्रिकेट सामन्यांचे विशेष प्रसारण हक्क मिळाले. Jio, Star आणि सोनी यांच्यातील सध्याच्या व्यवस्थेत ECB नेही करार सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.