

IPL 2026 Auction Matheesha Pathirana: IPL 2026 च्या लिलावात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना सर्वाधिक चर्चेत आहे. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याला तब्बल 18 कोटी रुपयांना विकत घेतलं असून, तो IPL इतिहासातील सर्वात महाग श्रीलंकन खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, याआधी त्याला खेळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) यंदाच्या लिलावात पाथिरानासाठी एकदाही बोली लावली नाही.
पाथिरानाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. लिलावाच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात त्याच्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. दोन्ही संघ आपला अर्ध्याहून अधिक पर्स खर्च करण्यास तयार होते. मात्र, अखेरीस KKR समोर दोन्ही संघांनी हार मानली.
दिल्ली कॅपिटल्सने 15.60 कोटी रुपयांवर बोली थांबवली. त्यानंतरही लखनौ सुपर जायंट्सने माघार न घेता 17.80 कोटी रुपयांपर्यंत बोली वाढवली. मात्र, या टप्प्यावर LSGने देखील माघार घेतली आणि अखेरीस KKR ने 18 कोटी रुपयांत पाथिरानाला आपल्या ताफ्यात सामील केलं.
याआधी IPL लिलावात सर्वाधिक किमतीचा श्रीलंकन खेळाडू होण्याचा विक्रम वानिंदु हसरंगाच्या नावावर होता. त्याला 2022 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पाथिरानाने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला आहे.
गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने पाथिरानाला 13 कोटी रुपयांत रिटेन केलं होतं. मात्र यंदा KKR ने त्याच्यापेक्षा 5 कोटी रुपयांनी अधिक बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. याच लिलावात KKR ने याआधी कॅमरून ग्रीनसाठी 25.20 कोटी रुपयांची बोली लावूनही लक्ष वेधून घेतलं होतं.
मथीशा पाथिरानाने आतापर्यंत IPL मधील 32 सामन्यांत 47 बळी घेतले आहेत. 2025 चा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला नव्हता. त्या हंगामात त्याने CSK साठी 12 सामन्यांत 13 बळी घेतले होते. मात्र त्याआधीच्या हंगामात केवळ 6 सामन्यांत 13 बळी घेत त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. आता KKR च्या जर्सीत पाथिराना कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.