

IPL Auction 2026 Izaz Sawaria: नशीब कधी, कुठे आणि कसं बदलेल, हे सांगता येत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे इजाज सावरिया. अवघ्या 20 वर्षांचा हा तरुण आजपर्यंत कधीही प्रोफेशनल क्रिकेट खेळलेला नाही. देशांतर्गत स्पर्धा नाहीत, राज्य संघाचं प्रतिनिधित्व केलं नाही, मोठे आकडे नाहीत. तरीही IPL 2026 च्या मिनी लिलावात त्याच्या नावावर बोली लागणार आहे. हे शक्य झालं फक्त इंस्टाग्राम रील्समुळे.
इजाज सावरियाने आपल्या लेग स्पिन गोलंदाजीचे छोटे व्हिडिओ सातत्याने सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. ना मोठी स्पर्धा, ना प्रसिद्ध प्रशिक्षक फक्त मेहनत, सराव आणि मोबाईल कॅमेरा. या रील्स पाहूनच IPL मधील काही फ्रँचायझींचे त्याच्याकडे लक्ष गेलं.
इजाजची गोलंदाजी खास करून लेग स्पिन आणि गुगलीमुळे चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांसारख्या संघांचे स्काऊट्स त्याच्यापर्यंत पोहोचले. यातूनचं त्याचं नाव IPL 2026 च्या लिलावात समाविष्ट करण्यात आलं.
राजस्थानचा रहिवासी असलेला लेग स्पिनर इजाज सावरियाने राजस्थान क्रिकेट असोसिएशनमार्फत आपली नोंदणी केली आहे. त्याने ना भारताचं, ना राजस्थानचं कोणतही प्रतिनिधित्व केलं आहे. तरीही तो IPL 2026 लिलावात खेळाडू क्रमांक 265 म्हणून उतरणार आहे. चौथ्या सेटमध्ये त्याच्या नावावर बोली लागेल. त्याची बेस किंमत 30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, पहिल्यांदाच तो प्रोफेशनल क्रिकेटच्या उंबरठ्यावर आहे.
इजाज सोशल मीडियावर आपल्या सरावाचे, गोलंदाजीचे व्हिडिओ नियमितपणे शेअर करतो. त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, देशी आणि परदेशी क्रिकेटपटूंनीही त्याच्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंग्लंडचा गोलंदाज आदिल रशीद, आयर्लंडचा सिमी सिंग, तसेच भारताचा विपराज निगम यांसारख्या खेळाडूंनी त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आहे.
इजाज सावरियाने जयपूरच्या संस्कार क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतलं आहे. मात्र, त्याची खरी ओळख निर्माण झाली ती सोशल मीडियावरून. केवळ रील्सच्या जोरावर तो थेट IPL लिलावापर्यंत पोहोचला आहे. आता एकच प्रश्न आहे की लिलावात त्याला कोणता संघ घेणार?