

sunil gavaskar praises shreyas iyer captaincy targeting gautam gambhir
श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात एक-दोन नव्हे तर तीन संघांना प्लेऑफमध्ये पोहचवणारा पहिला कर्णधार बनला आहे. दिल्ली कॅपिटल्स, केकेआर नंतर अय्यरने त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले आहे. त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवारी (दि. 18) राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर गावस्कर यांनी अय्यरवर स्तुतीसुमने उधळताना असे काही म्हटले की जणू ते गौतम गंभीरला लक्ष्य करत आहेत असे वाटले.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये अय्यरवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. गावस्कर म्हणाले की, ‘गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवूनही, त्याचे श्रेय अय्यरला मिळाले नाही. संघाला जेतेपद जिंकण्याचे श्रेय डगआउटमध्ये बसलेल्या कोणालाही देऊ नये. पण या वर्षी अय्यरला योग्य श्रेय मिळत आहे. कोणीही ते एकट्या रिकी पॉन्टिंगला देत नाहीय.’
मैदानावर कर्णधाराची भूमिका सर्वात महत्त्वाची असते आणि त्याला विजयाचे श्रेय मिळाले पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी केकेआर चॅम्पियन झाल्यानंतर, मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरचे सर्वत्र कौतुक झाले. याच मुद्द्याला धरून गावस्कर यांनी गंभीरवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे बोलले जात आहे.
श्रेयस अय्यर आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 12 सामन्यांमध्ये 174.50 च्या स्ट्राईक रेटने 435 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. अय्यरने 2014 नंतर पहिल्यांदाच पंजाबला प्लेऑफमध्ये नेले आहे. या हंगामात 12 सामन्यांत 8 विजयांसह पंजाब देखील जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
श्रेयस अय्यर हा एकमेव कर्णधार आहे ज्याने 3 वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये नेले आहे. आयपीएल 2020 मध्ये अय्यर हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. त्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली डीसीने अंतिम धडक मारली होती. 2023 मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर आयपीएल खेळला नव्हता. पण 2024 मध्ये जेव्हा त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले तेव्हा त्याने कोलकात्याला केवळ प्लेऑफमध्ये नेले नाही तर आयपीएल ट्रॉफीही जिंकली. तथापि, कोलकाताने त्याला मेगा लिलावात रिलीज केले. याचा फायदा घेत पंजाबने त्याला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अय्यरने हा विश्वास खरा ठरवला आणि 11 वर्षांत पहिल्यांदाच पंजाबला प्लेऑफमध्ये नेले.