

ind vs eng test series sarfaraz khan lose 10 kg weight
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा फलंदाज सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कडक डाएट प्लॅनद्वारे 10 किलो वजन कमी केले आहे. 2024 मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या सर्फराजने विदेशात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी या फलंदाजाची इंडिया अ संघात निवड झाली आणि तो या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सज्ज होत आहे.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांत भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी सर्फराज कठोर मेहनत घेत आहे. त्याने स्वत:ची शारीरिक चपळता वाढवण्यासाठी वजन कमी केले. यासाठी त्याच्या आहारात मोठा बदल करण्यात आला. सर्फराजच्या आहारात उकडलेल्या भाज्यांचा समावेश केला असून त्याने मांसाहार टाळल्याचे वृत्त आहे. तसेच हा 27 वर्षीय फलंदाज इंग्लिश खेळपट्टीवर ऑफ-स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूंना तोंड देण्यासाठी जीवतोडून सराव करत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेईल हा आजकालचा सर्वात मोठा प्रश्न आहे. चौथ्या क्रमांकावर कोहलीची जागा घेण्यासाठी केएल राहुल आणि शुभमन गिलची नावे आघाडीवर आहेत. या शर्यतीत सर्फराज खान याचेही नाव आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सर्फराजने 10 किलो वजन कमी केले आहे. तो सध्या त्याच्या आहाराची खूप काळजी घेत आहे. एवढेच नाही तर इंग्लिश खेळपट्टीवर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना तोंड देण्यासाठी तो कसून सराव करत आहे. अशा स्विंगवर तोडगा काढण्यावर त्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडिया इंग्लंडच्या भूमीवर नवीन कसोटी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल. कोहली आणि रोहितच्या जागी निवड समिती कोणाला संधी देते हे पाहणे देखील मनोरंजक असेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारत-अ संघात सर्फराज खानचा समावेश करण्यात आला आहे. आता त्याला मुख्य संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा भाग सर्फराज होता, पण त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने शानदार शतक झळकावले होते.