

shreyas iyer only captain to lead three different teams in playoffs
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने रविवारी (दि. 18) इतिहास रचला. हा संघ तब्बल 11 वर्षांनंतर आयपीएल प्लेऑफमध्ये धडक मारण्यात यशस्वी झाला. यासह, संघाचा कर्णधार अय्यरने एक विशेष टप्पा गाठून इतिहास रचला आहे. तो 3 वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये घेऊन जाणारा पहिला कर्णधार बनला आहे. याआधी, आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला असा चमत्कार करता आलेला नाही.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी प्रत्येकी पाच ट्रॉफी जिंकणा-या अनुक्रमे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांनाही असा पराक्रम गाजवता आलेला नाही. त्यामुळेच श्रेयस अय्यरची कामगिरी आणखी खास बनते. 2014 मध्ये वेळी पंजाब संघ आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरला होता, मात्र तेव्हा अय्यरने आयपीएलमध्ये पदार्पणही केले नव्हते.
आयपीएल 2020 मध्ये अय्यर हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. त्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली डीसीने अंतिम धडक मारली होती.परंतु संघाला जेतेपद पटकावता आले नाही. गेल्या हंगामात, म्हणजे आयपीएल 2024मध्ये अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार झाला. या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने केवळ प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही तर आयपीएलची ट्रॉफी उंचावली.
पण चॅम्पियन बनूनही, केकेआरने अय्यरला कायम ठेवले नाही. त्यामुळे 2024च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने अय्यरसाठी 26.75 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. तसेच काही दिवसातच्या त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता अय्यरकडे पंजाबला चॅम्पियन बनवण्याची उत्तम संधी आहे. जर तो असे करण्यात यशस्वी झाला तर तो आयपीएलमध्ये दोन संघांना चॅम्पियन बनवणारा पहिला कर्णधार बनू शकतो. आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत असे कधीही घडलेले नाही.
पंजाब किंग्जने रविवारी राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 विकेट गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या.
पंजाब संघ सध्या 12 सामन्यांत 8 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी ते पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न करतील.