

मुंबई इंडियन्स (MI) ला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे, कारण त्यांना त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) कडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची आयपीएल 2025 मधील सुरुवात खराब झाली. पण जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होताच एमआय संघाने एकापाठोपाठ सामने जिंकले आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. या कामगिरीनंतर संघाला पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन स्थानांसाठी प्रबळ दावेदार मानले होते, पण सोमवारी मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागणार हे निश्चित झाले.
आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होतात आणि पॉइंट टेबलमधील अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात. यापैकी, अव्वल दोन संघांमध्ये Qualifier 1 सामना खेळवला जातो. हा सामना जो संघ जिंकतो, तो थेट Final मध्ये पोहोचतो. तर जो संघ हरतो, त्याला फायनल गाठण्यासाठी Qualifier 2 द्वारे अजून एक संधी मिळते.
दुसरा सामना पॉइंट्स टेबलमधील 3 आणि 4 क्रमांकाच्या संघांत होतो. हा एलिमिनेटर सामना म्हणून ओळखला जातो. हा सामना जो संघ गमावतो तो स्पर्धेतून थेट बाद होतो. तर सामना जिंकणारा संघ Qualifier 2 मध्ये पोहचतो.
तिसरा सामना Qualifier 1 मध्ये हरलेला संघ आणि Eliminator मध्ये जिंकलेला संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. तर Qualifier 1 जिंकलेला संघ आणि Qualifier 2 जिंकलेला संघ एकमेकांविरुद्ध IPL विजेतेपदासाठी भिडतात.
या हंगामात, पंजाब किंग्जने टॉप-2 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरमध्ये खेळावे लागणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पण त्यानंतर झालेल्या पराभवांमुळे एमआयला एलिमिनेटर सामना खेळाला लागणार आहे. दरम्यान, या संघाची एलिमिनेटर सामन्यांमधील कामगिरी संमिश्र आहे.
मुंबई इंडियन्सने IPL इतिहासात प्लेऑफमध्ये एकूण 20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 13 सामने जिंकले आहेत, ज्यामुळे त्यांचा विजय दर सुमारे 65% आहे. विशेषतः, एलिमिनेटर सामन्यांमध्ये त्यांनी 4 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत.
IPL 2023 मध्ये, मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळला आणि 81 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात, अकाश मधवालने 5 विकेट्स फक्त 5 धावांत घेतल्या, ज्यामुळे त्यांना 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर, मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. त्यांच्या एलिमिनेटर सामन्यांमधील कामगिरी खालीलप्रमाणे आहे :
2011 : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय
2012 : चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव
2014 : चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव
2023 : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय
या कामगिरीवरून स्पष्ट होते की, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यांमध्ये काही वेळा अडचणींचा सामना केला आहे, परंतु त्यांनी काही महत्त्वाचे विजयही मिळवले आहेत. IPL 2025 मध्ये, त्यांना एलिमिनेटर सामन्यातून पुढे जाण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि संघाच्या ताकदीचा योग्य वापर करावा लागेल.
आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना 30 मे रोजी मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी कोण असेल हे लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. जर आरसीबी जिंकला तर गुजरात टायटन्स एलिमिनेटरमध्ये खेळेल; अन्यथा, आरसीबी मुंबईशी सामना करेल.
यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाने पाच वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबईने एकूण 10 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, त्यापैकी पाच वेळा टॉप-2 मध्ये राहून जेतेपद जिंकले आहे.
2010 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली मुंबईने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती पण चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय, मुंबईने 2011, 2012, 2014 आणि 2023 च्या प्लेऑफमध्येही प्रवेश केला होता, परंतु त्या हंगामांत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे त्यांना एलिमिनेटरमध्ये खेळावे लागले. या चारही वेळा मुंबईला कधीही अंतिम फेरी गाठता आली नाही.