

Ind vs NZ 1st ODI Playing XI Yashasvi Jaiswal Rishabh Pant Likely on Bench
बडोदा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना बडोदा येथे खेळवला जाणार असून, यासाठी दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत. सराव सत्रांना वेग आला असतानाच, सर्वांचे लक्ष भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीकडे लागले आहे. मैदानावर नेमके कोणते ११ शिलेदार उतरणार आणि कोणाला बाकावर बसावे लागणार, याचे समीकरण समजून घेणे रंजक ठरेल.
या मालिकेत पुन्हा एकदा शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विजय हजारे करंडक स्पर्धेत केवळ एक सामना खेळलेल्या गिलला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर निवड समितीची नजर असेल. सलामीला कर्णधार गिलसोबत अनुभवी रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल हे जवळपास निश्चित आहे. ही जोडी स्थिर असल्याने फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालला पहिल्या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता दाट आहे.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान अढळ आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही विजय हजारे करंडकात प्रत्येकी एक शतक झळकावून आपण फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या मालिकेतही दमदार सुरुवातीची अपेक्षा आहे. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येईल. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या श्रेयसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
यष्टिरक्षकाच्या जागेसाठी भारतीय संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत असे दोन तगडे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ताज्या समीकरणानुसार राहुलला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत पंतला बॅक-अप कीपर म्हणून मैदानाबाहेर थांबावे लागू शकते.
संघात समतोल राखण्यासाठी भारत तीन अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊ शकतो. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश असू शकतो. हे तिघेही फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात संघाला मजबुती देतील.
वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. संघात हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे, परंतु सुंदर आणि जडेजा दोघेही खेळल्यास हर्षित राणाला संधी मिळणे कठीण दिसते. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाईल. मात्र, अंतिम ११ खेळाडूंची अधिकृत घोषणा ११ जानेवारीला दुपारी १ वाजता टॉसच्या वेळीच स्पष्ट होईल.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.