

राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी सज्ज होत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा आक्रमक फलंदाज तिलक वर्मा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या दुखापतीमुळे तो केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवरच नाही, तर आगामी टी-२० विश्वचषकातूनही बाहेर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वृत्तानुसार, 'विजय हजारे करंडक' स्पर्धेत हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना राजकोटमध्ये तिलक वर्माला पोटात असह्य वेदना जाणवू लागल्या. बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेनंतर तिलकला पूर्णपणे सावरण्यासाठी किमान ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत तो खेळणे अशक्य मानले जात आहे.
भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध होणार आहे. तिलक वर्माच्या रिकव्हरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, तो विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. गेल्या वर्षभरात तिलक हा भारतीय संघाच्या मधल्या फळीचा कणा ठरला आहे. विशेषतः गेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने साकारलेली अर्धशतकी जिगरबाज खेळी भारताच्या जेतेपदासाठी निर्णायक ठरली होती.
तिलक वर्मा अनिश्चित काळासाठी बाहेर पडल्यामुळे निवड समितीला आता जुन्या योजनांवर पुन्हा विचार करावा लागणार आहे. मधल्या फळीतील पोकळी भरून काढण्यासाठी शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. तसेच, सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रियान परागचाही संघात समावेश करण्याचा विचार होऊ शकतो.
ऑगस्ट २०२३ मध्ये पदार्पण केल्यापासून तिलकने आपल्या बॅटने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या नावावर असलेल्या आकडेवारीवरून त्याची उणीव किती भासणार आहे, हे स्पष्ट होते.
सामने : ४०
धावा : १,१८३
सरासरी : ४९.२९
स्ट्राईक रेट : १४४.०९
शतके : २
अर्धशतके : ६
सर्वोच्च धावसंख्या : १२०*
चर्चा अशी होती की तिलकच्या जागी शुभमन गिलला संघात स्थान मिळेल. मात्र, ताज्या अहवालांनुसार निवड समिती गिलला या मालिकेत घेण्यास फारशी उत्सुक नाही. सध्या तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत त्याला संघात घेऊन प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न देणे 'विचित्र' वाटू शकते, असे निवडकर्त्यांचे मत आहे.
२१ जानेवारीपासून नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. तिलक वर्माच्या अनुपस्थितीत निवड समिती कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत तीन प्रमुख नावे आघाडीवर आहेत.
कर्नाटकचा हा डावखुरा फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ७ डावात तब्बल ६२० धावा कुटल्या आहेत. डावखुरा फलंदाज म्हणून तो टिळक वर्माचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
महाराष्ट्राचा लाडका खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव असून कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे.
दुखापतीतून सावरून श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना ५३ चेंडूत ८२ धावांची झंझावाती खेळी केली. डिसेंबर २०२३ पासून टी-२० संघाबाहेर असलेल्या अय्यरसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.