

मुंबई इंडियन्स विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज
स्मृतीची आरसीबी-जेमिमाच्या दिल्लीचेही तगडे आव्हान
नवी मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचा थरार शुक्रवारपासून (दि. 9) सुरू होत असून, आगामी महिला टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा खेळाडूंसाठी रंगीत तालीम ठरणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. यंदाची स्पर्धा नवी मुंबई आणि बडोदा येथे दोन टप्प्यांत पार पडणार असून, जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची एक प्रकारे येथे ड्रेस रिहर्सलच असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडे कागदावर सर्वात समतोल संघ आहे. संघात नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्यूजसारख्या दिग्गज कर्णधारांचा समावेश असून, अमेलिया केर आणि अमनजोत कौर यांच्यामुळे फलंदाजीची बाजू भक्कम आहे. गोलंदाजीची धुरा अनुभवी शबनिम इस्माईल आणि सायका इशाक यांच्या खांद्यावर असेल.
मेग लॅनिंगने संघ सोडल्यानंतर आता जेमिमा रॉड्रिग्स दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. गेल्या तीनही हंगामांत अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याचा इतिहास बदलण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. संघात शफाली वर्मा, स्नेह राणा आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड यांसारखे स्फोटक खेळाडू आहेत. मात्र, ॲनाबेल सदरलँडच्या माघारीमुळे त्यांच्या लाईनअपवर काहीसा परिणाम झाला आहे.
एलिस पेरीच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनावर ‘आरसीबी’च्या फलंदाजीची मोठी भिस्त असेल. संघाकडे जॉर्जिया वॉल, ग्रेस हॅरिस आणि नॅडिन डी क्लर्क यांसारखे परदेशी पर्याय उपलब्ध आहेत. यष्टिरक्षक रिचा घोषची भूमिका फिनिशर म्हणून निर्णायक ठरेल. गोलंदाजीमध्ये रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार आणि लॉरेन बेल यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल.
गुजरात जायंटस्चे नेतृत्व ॲश्ले गार्डनर करत असून, त्यांच्याकडे बेथ मुनी आणि सोफी डिव्हाईनसारखे अनुभवी खेळाडू आहेत. दुसरीकडे, पूर्णपणे नवीन रूप धारण केलेल्या यूपी वॉरियर्सने मेग लॅनिंगला कर्णधारपद सोपवले आहे. दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोन या त्यांच्या संघात ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतात.
मुंबई इंडियन्स महिला वि. आरसीबी महिला
डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
वेळ : सायं. 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार