WPL Records : सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? मुंबई इंडियन्सचे वर्चस्व

रणजित गायकवाड

महिला प्रीमियर लीगच्या (WPL)च्या चौथ्या हंगामाचा थरार शुक्रवारीपासून (९ जानेवारी) सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स असे पाच तगडे संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.

हंगामाचा सलामीचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात खेळवला जाईल.

स्पर्धेच्या या नव्या पर्वापूर्वी, डब्ल्यूपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या अव्वल ५ गोलंदाजांचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल. विशेष म्हणजे, या यादीत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत असून, पहिल्या पाचमध्ये मुंबईच्याच ३ खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.

हेली मॅथ्यूज (मुंबई इंडियन्स)

WPLच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजच्या नावावर आहे. तिने आतापर्यंत २९ सामन्यांत १७.५६ च्या सरासरीने सर्वाधिक ४१ बळी घेतले आहेत. ५ धावांत ३ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी असून, २०२३ च्या पहिल्या हंगामात तिने 'पर्पल कॅप' जिंकली होती.

अमेलिया केर (मुंबई इंडियन्स)

न्यूझीलंडची स्टार फिरकीपटू अमेलिया केर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत ४० गडी बाद केले आहेत. २०२५ च्या हंगामात १८ बळी घेत तिने 'पर्पल कॅप'वर आपले नाव कोरले होते.

सोफी एक्लेस्टोन (यूपी वॉरियर्स)

जगातील अव्वल फिरकीपटूंपैकी एक असलेल्या सोफी एक्लेस्टोनने यूपी वॉरियर्ससाठी शानदार कामगिरी केली आहे. २५ सामन्यांच्या २५ डावांत तिने १८.३८ च्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत. १३ धावांत ४ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.

जेस जोनासेन (दिल्ली कॅपिटल्स)

दिल्ली कॅपिटल्सची विश्वासू गोलंदाज जेस जोनासेन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तिने २४ सामन्यांत २०.७५ च्या सरासरीने ३३ बळी मिळवले आहेत. ३१ धावांत ४ बळी ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम आकडेवारी आहे.

नॅट सायव्हर-ब्रंट (मुंबई इंडियन्स)

इंग्लंडची दिग्गज अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने बॅटसोबतच बॉलनेही मुंबईसाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. २९ सामन्यांत ३२ बळींसह ती या यादीत पाचव्या स्थानावर आहे.