

IPL 2025 Punjab Kings vs Delhi Capitals removes stats
आयपीएलचा उर्वरित हंगाम पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे काही दिवसांसाठी ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. पण बीसीसीआयने 17 मे पासून आयपीएलला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता पुढील सामन्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, त्याआधी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बदलाबाबत जोरदार चर्चा झडत आहे.
दोन्ही संघांमध्ये आता 24 मे रोजी पुन्हा नव्याने सामना खेळला जाणार आहे. जयपूरमध्ये ही लढत रंगणार असून या सामन्यापूर्वी बीसीसीआयने अनेक मोठे बदल केल्याचे समोर आले आहे.
8 मे रोजीच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील शहरांवर ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी शस्त्रू देशाची अनेक ड्रोन्स आणि मिसाईल्स हाणून पाडली. याच दिवशी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना खेळवला जात होता. पहिल्या डावातील 10 षटकांचा खेळ झाला होता. परिणामी पाकच्या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून मैदानावरील फ्लडलाईट्स ऑफ करून ब्लॅकआऊट करण्यात आला. सामना तत्काळ थांबला. त्याच्या दुस-या दिवशी बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेत भारत-पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलला स्थगिती दिली.
आता जेव्हा बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जाहीर केले तेव्हा पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना पुन्हा खेळवण्यात येईल असेही म्हटले आहे. दरम्यान, त्या सामन्यात जो खेळ झाला त्याची आकडेवारी डिलीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे फलंदाजांनी केलेल्या धावा, गोलंदाजांनी टाकले चेंडू आणि घेतलेल्या विकेट्स वगळले जातील. त्या सामन्याचे जे काही धावफलकावरील आकडे होते ते हटवले गेले आहेत.
सामना थांबवला तेव्हा पंजाब किंग्जच्या प्रभसिमरन सिंगने 28 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. तर प्रियांश आर्यने 34 चेंडूत 70 धावांची फटकावल्या होत्या. या दोघांमध्ये 122 धावांची भागीदारी झाली होती. आता या सामन्याचा सर्व डेटा आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकण्यात आला आहे.
या सामन्यानंतर प्रभसिमरन सिंगच्या आयपीएल 2025मधील एकूण धावा 487 पर्यंत वाढल्या होत्या. पण आता पुन्हा त्याच्या धावा 437 पर्यंत खाली आल्या आहेत. इतकेच नाही तर नटराजनने घेतलेली विकेटही काढून टाकण्यात आली आहे. याचा अर्थ असा की हा सामना आकडेवारीत कुठेही समाविष्ट केला जाणार नाही.
एवढेच नाही तर माधव तिवारीला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली, पण आता तो पुन्हा एकदा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. म्हणजे जर तो पुढचा सामना खेळला तर त्याला पुन्हा पदार्पणाची कॅप मिळेल, पण जर तो खेळू शकला नाही तर तो अनकॅप्ड राहील.