

Rohit Sharma Virat Kohli BCCI Central Contract
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोन्ही स्टार फलंदाजांनी यापूर्वीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. आता प्रश्न असा आहे की, त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या श्रेणीत बदल होईल का?
नुकतीच बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली होती. यामध्ये विराट आणि रोहित यांना A+ श्रेणीत ठेवण्यात आले होते. परंतु आता दोघांनीही टी-20 सह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळणार आहेत. अशा परिस्थितीत, बीसीसीआय त्यांच्या पगारात कपात करेल की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली होती. पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी विराट आणि रोहित यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट श्रेणीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ज्यानंतर या मुद्द्यावर पडदा पडला आहे.
बीसीसीआयचे सचिव सैकिया म्हणाले की, ‘रोहित शर्मा, विराट कोहली यांनी जरी टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील.’
यामुळे हे स्पष्ट होते की, दोघांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. दोघांनाही बीसीसीआयकडून प्रति वर्ष सात कोटी रुपये मिळत राहतील.
बीसीसीआयने एप्रिलमध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची नवी यादी जाहीर केली होती. या यादीत बीसीसीआयने 34 खेळाडूंचा समावेश केला, ज्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले. ही करार यादी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी असणार आहे.
बीसीसीआय फक्त अशा खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करते ज्यांनी एका वर्षात किमान 3 कसोटी, 8 एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर एखादा खेळाडू कसोटी खेळत नसेल पण एकदिवसीय आणि टी-20 खेळत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टचा भाग बनले जाते.