

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री हल्ला केला. या धडक कारवाईने पाकिस्तानचे धाबे दणाणले. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर पाकिस्तानने नमते घेतले. युद्धविरामानंतर आता शनिवार, १७ मेपासून आयपीएलचा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि फ्रँचायझींना त्यांचे सर्व खेळाडू एकत्र करण्याचे निर्देश दिले. तथापि, काही परदेशी खेळाडूंनी उर्वरित हंगामासाठी अनुपलब्धता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलने संघांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळापत्रकानुसार, आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता पण आता तो ३ जून रोजी होणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय संघात सामील होणाऱ्या खेळाडूंना त्यात खेळणे कठीण होणार आहे. यामुळे 'बीसीसीआय'ने उर्वरित आयपीएलसाठी संघांना तात्पुरते पर्यायी खेळाडूंना खेळण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी एखादा खेळाडू दुखापत किंवा आजारी असल्यास संघाने १२ सामन्यांपूर्वी पर्याय घेतलेला असेल तरच त्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देता येते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने हा नियम बदलला आहे. संघांना खेळाडू बदलासाठी 'तात्पुरते पर्याय' देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या खेळाडूंनी उर्वरित हंगामासाठी न येण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या जागी संघांना नवीन खेळाडू घेण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, हे तात्पुरते खेळाडू पुढील हंगामासाठी राखीव (retain) ठेवता येणार नाहीत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल २०२५ च्या सुधारित वेळापत्रकाची घोषणा केल्यापासून परदेशी खेळाडूंची उपलब्धता चर्चेचा विषय बनली आहे. फायनल सामना ३ जून रोजी होणार असल्यामुळे, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC Final) आणि इंग्लंड-वेस्ट इंडीज ODI मालिकेमुळे शक्यतो उपलब्ध होणार नाहीत. आयपीएलच्या सूत्रांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला आयपीएल २०२५ तात्पुरते स्थगित करावे लागले. आम्ही पर्यायी खेळाडूंशी संबंधित तरतुदींचे पुनर्मूल्यांकन केले आहे. राष्ट्रीय प्रतिबद्धता किंवा वैयक्तिक कारणांमुळे किंवा कोणत्याही दुखापती किंवा आजारामुळे काही परदेशी खेळाडूंची अनुपलब्धता लक्षात घेता, स्पर्धेच्या समाप्तीपर्यंत तात्पुरत्या आधारावर पर्यायी खेळाडूंची निवड करण्याची संघांना परवानगी दिली जाईल. मात्र या टप्प्यापासून घेतलेले तात्पुरते बदली खेळाडू पुढील वर्षी राखण्यास पात्र राहणार नाहीत.'
बीसीसीआयने केलेल्या बदलाबाबत एका उदारहण पाहूया. जर वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क याने यंदाच्या हंगामात आयपीएलमधील उर्वरीत सामन्यात सहभागी होण्यास असमर्थता दर्शवल्यास दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची परवानगी दिली जाईल. हा पर्यायी खेळाडू केवळ आयपीएल २०२५ पर्यंतच दिल्ली संघाकडून खेळू शकेल. दिल्ली कॅपिटल्स त्याला आयपीएल २०२६ साठी राखून ठेवू शकणार नाही. अशावेळी तो खेळाडू २०२६ च्या लिलावासाठी नोंदणी करेल. याचवेळी दिल्ली कॅपिटल्स मिचेल स्टार्कला पुढील हंगामासाठी आपल्या संघातील स्थान अबाधित ठेवू शकते. बीसीसीआयच्या मेलमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, आयपीएल २०२५ स्थगित झाल्यानंतर घेतले गेलेले पर्यायी खेळाडूच पुढील हंगामासाठी राखून ठेवता येणार नाहीत. म्हणजेच, स्थगितीपूर्वी घेतले गेलेले खेळाडू संघांनी राखून ठेवण्यास पात्र आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला, जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या जागी घेतले आहे. जेकने उर्वरित हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच, चेन्नई सुपर किंग्सचा जेमी ओव्हर्टनही उर्वरित सामन्यांतून माघार घेत आहे.