

India Highest Test Score Wellington : टीम इंडियाच्या झंझावती फलंदाजीसमोर न्यूझीलंडची गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली असून, वेलिंग्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने धावांचा आणि विक्रमांचा नवा इतिहास रचला आहे. भारताने ९ बाद ७२० धावांवर पहिला डाव घोषित करत परदेशातील आपली सर्वोच्च कसोटी धावसंख्या नोंदवली. या सामन्यात ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे एकाच दिवसात टीम इंडियासह पंतच्या नावावर विक्रमांची रांग लागली.
भारतीय क्रिकेट संघाची ९ बाद ७२० ही धावसंख्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च तिसरी सर्वोच्च, तर परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्ध तसेच न्यूझीलंडच्या भूमीवर कोणत्याही संघाने केलेली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी १९९५ मध्ये याच मैदानावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध ५ बाद ६६० धावा केल्या होत्या, तर २०१९ मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध ६ बाद ७१५ धावा उभारल्या होत्या. हे दोन्ही विक्रम भारताने मोडीत काढले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक धावा करण्याची भारताची ही पाचवी वेळ असून, या यादीत केवळ श्रीलंका (७ वेळा) भारताच्या पुढे आहे. २०२० च्या गेल्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताने दोन कसोटींच्या चार डावांत मिळून एकूण ७२२ धावा केल्या होत्या; यंदा एकाच डावात भारताने जवळपास तितक्या धावांचा पाऊस पाडला आहे.२०१६ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध १९०.४ षटकांत ३७ बाद ७५९ (डाव घोषित) या सर्वोच्च धावसंख्येचा समावेश आहे. त्यानंतर २००९ मध्ये ब्रेबॉर्न येथे श्रीलंकेविरुद्ध १६३.३ षटकांत ४.४४ च्या धावगतीने ९ बाद ७२६ (डाव घोषित), तर २०२६ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध १६६ षटकांत ४.३३ च्या धावगतीने ९ बाद ७२० (डाव घोषित) धावा नोंदवल्या गेल्या. याशिवाय, २०१० मध्ये कोलंबो (SSC) येथे श्रीलंकेविरुद्ध २२५.२ षटकांत ३.१३ च्या धावगतीने ७०७ धावा आणि २००४ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७.३ षटकांत ३.७६ च्या धावगतीने ७ बाद ७०५ (डाव घोषित) अशा भक्कम धावसंख्या भारताने उभारल्या आहेत.
कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाच्या पहिल्या सातही विकेटसाठी ५० हून अधिक धावांच्या भागीदाऱ्या रचल्या गेल्या आहेत. एकाच डावात सात अर्धशतकी भागीदाऱ्या करून भारताने ऑस्ट्रेलियाच्या (अॅशेस २०२५/२६) विक्रमाशी बरोबरी साधली. एकाच डावात सर्वाधिक आठ अर्धशतकी भागीदाऱ्यांचा विश्वविक्रमही भारताच्याच (विरुद्ध इंग्लंड, ओव्हल २००७) नावावर आहे.
एका कसोटी डावात संघाच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी ८० किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. यापूर्वी २०१४ मध्ये अबुधाबी येथे न्यूझीलंडविरुद्धच पाकिस्तानने अशी कामगिरी केली होती.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या आक्रमक शैलीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. कसोटी कारकिर्दीत १०८ षटकार पूर्ण करत पंतने न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमला (१०७) मागे टाकले आहे. कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता केवळ इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या (१३८) मागे दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताने या डावात लगावलेले १४ षटकार ही त्यांची एका डावातील संयुक्तपणे तिसरी सर्वोच्च संख्या आहे.
हे पंतचे कसोटीतील नववे शतक ठरले. यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याच्या यादीत त्याने इंग्लंडच्या लेस एम्सला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले. त्याच्यापुढे आता केवळ अॅडम गिलख्रिस्ट (१७) आणि अँडी फ्लॉवर (१२) आहेत.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या चारही देशांत कसोटी शतक झळकावणारा पंत हा सहावा भारतीय ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि शनिवारीच के. एल. राहुलने हा टप्पा गाठला होता. मात्र, यष्टिरक्षक म्हणून या चारही देशांत शतके ठोकणारा पंत हा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स १२२ सामन्यांत ७२७३ धावा, ८३३ चौकार आणि १३८ षटकारांसह (प्रत्येक ९०.०५ चेंडूंमागे एक षटकार) अग्रस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ ऋषभ पंतने ५३ सामन्यांत ३८५२ धावा, ४०६ चौकार आणि १०८ षटकार लगावले असून, दर ४७.९३ चेंडूंमागे त्याचा एक षटकार येतो. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने १०१ सामन्यांत ६४५३ धावा, ७७६ चौकार आणि १०७ षटकारांसह (९३.३९ चेंडूंमागे एक षटकार) तिसरे स्थान राखले आहे, अॅडम गिलख्रिस्टने ९६ सामन्यांत ५५७० धावा, ६७४ चौकार आणि १०० षटकारांसह (६७.९२ चेंडूंमागे एक षटकार) चौथे स्थान पटकावले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दोन्ही डावांत पहिल्याच षटकात बळी घेत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला तंबूत धाडले. एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत पहिल्याच षटकात विकेट घेणारा बुमराह हा एस. श्रीशांत (२००६) आणि झहीर खान (२००७) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
दुसरीकडे, दोन्ही डावांत शून्यावर बाद झाल्यामुळे (पेअर) टॉम लॅथमवर मोठी नामुष्की ओढवली. कसोटीत 'पेअर' होणारा तो न्यूझीलंडचा तिसरा कर्णधार (हॅरी केव्ह आणि स्टीफन फ्लेमिंगनंतर) ठरला आहे. कसोटी कारकिर्दीत सलामीवीर म्हणून लॅथम १६ व्यांदा शून्यावर बाद झाला असून, सलामीवीरांमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या यादीत तो मार्वन अटापट्टूसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
भारतीय फलंदाजांच्या तडाख्यात न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीने ३३ षटकांत तब्बल २०१ धावा मोजून १ बळी घेतला. एका कसोटी डावात सर्वाधिक धावा देणारा तो न्यूझीलंडचा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी १९८९ मध्ये स्टीफन बूकने पाकिस्तानविरुद्ध २२९ धावा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, प्रतिचेंडू एकापेक्षा जास्त धावगतीने (६.०९ इकॉनॉमी) २०० हून अधिक धावा देणारा डफी हा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.