

Kapil Dev On Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत युवा खेळाडू, अशी ओळख निर्माण केलेल्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात प्रवेश मिळवत नवा रेकॉर्डही केला आहे. मात्र जुलै २०२६ मधील इंग्लंड दौऱ्यात तो काहीसा बॅकफूटवर गेला, मात्र झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने कमबॅक केले. आता वैभवबाबत १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी मोठे विधान केले आहे. त्यांना त्याच्या गुणवत्तेबद्दल कोणताही संशय नाही; मात्र, त्यांनी वैभवला एक महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विश्व क्रिकेटमध्ये स्वतःची ठाम ओळख निर्माण करण्यासाठी वैभवला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले. यासंदर्भात बोलताना त्यांनी ९० च्या दशकातील भारताचे अत्यंत गुणवान फलंदाज विनोद कांबळी यांचे उदाहरण दिले. कांबळी यांनी अत्यंत वेगाने यश मिळवले; पण तितक्याच वेगाने ते क्रिकेटच्या पटलावरून गायब झाले. उत्तम गुणवत्ता असूनही विनोद कांबळी भारतासाठी केवळ १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामनेच खेळू शकले.
'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना कपिल देव म्हणाले, "वैभवबाबत भाष्य करणे सध्या जरा घाईचे ठरेल. त्याच्याकडे गुणवत्ता नक्कीच आहे; पण भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आले, ज्यांच्याकडे अफाट प्रतिभा होती; पण ते अचानक गायब झाले. विनोद कांबळीचेच उदाहरण घ्या."
"वैभव आता १५-१६ वर्षांचा आहे. त्याला अजून तीन वर्षांचा वेळ द्या, मग आपण बोलू. जसजशी त्याची जीवनशैली बदलेल, तसतशी त्याची विचारसरणीही बदलेल. पुढच्या दोन वर्षांत तो कसा घडतो, हे पाहणे त्याच्या सध्याच्या कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे," असेही कपिल देव यांनी स्पष्ट केले.
"आपण सचिन, विराट आणि रोहितला खेळताना पाहिले आहे. त्यांनी देशाचा अभिमान वाढवला. पण चाहते नेहमीच 'पुढचा स्टार कोण?' याच्या शोधात असतात. एक माजी क्रिकेटपटू म्हणून, विराट कोहलीची जागा घेऊन पुढील १५ वर्षे भारतासाठी सातत्याने खेळू शकेल असा कोणता तरुण खेळाडू आहे, हे पाहण्यात मला अधिक रस आहे," असेही कपिल देव यांनी नमूद केले.
सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश आहे. लखनऊ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, शुक्रवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन वैभवला अभिषेक शर्मासोबत सलामीला पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.