IND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय; टीम इंडियाच्या रणरागिणींचा बँकॉकमध्ये डंका
Ind vs Pak Team India 8 Wicket Win ACC Women's Asia Cup Rising Stars
बँकॉक : 'वुमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स' स्पर्धेत भारतीय महिला 'अ' संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी बँकॉक येथे पार पडलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवत पाकिस्तानला अक्षरशः धूळ चारली. भारताच्या या विजयात वृंदा दिनेशची वादळी खेळी आणि गोलंदाजांचा अचूक टप्प्यावरचा मारा निर्णायक ठरला.
पाकिस्तानी फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जेरीस आणले. भारतीय गोलंदाजीच्या धारदार माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव १८.५ षटकांत अवघ्या ९३ धावांत आटोपला. कर्णधार राधा यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात पाक फलंदाजांना अडकवत ३ षटकांत फक्त ११ धावा देऊन ३ बळी टिपले. तिला मोलाची साथ देताना प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पाकिस्तानचे तब्बल ८ फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.
वृंदा दिनेशचे 'रुद्र'रूप; अनुष्काची संयमी साथ
९४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. हुमैरा काझी खाते न उघडता बाद झाल्याने भारतीय गोटात काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या वृंदा दिनेशने पाकिस्तानी गोलंदाजांचा अक्षरश: समाचार घेतला. वृंदाने अवघ्या २९ चेंडूंत १२ खणखणीत चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावांची वादळी खेळी साकारली. वृंदाला अनुष्का शर्माने संयमी साथ दिली. या दोघींनी केवळ डाव सावरला नाही, तर धावांचा वेगही प्रचंड राखला. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६३ धावा कुटल्या होत्या.
अनुष्का शर्मा २४ धावा (२६ चेंडू, ५ चौकार) काढून बाद झाली. वृंदा आणि अनुष्का यांच्यात ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्यानंतर तेजल हसबनीसने मैदानात येत वृंदाच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वृंदा दिनेशने अवघ्या २९ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावांची खेळी केली, तर तेजलने ५ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले.
राधा, प्रेमा आणि सायमाची फिरकी अन् वेगाची जादू
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड घट्ट केली होती. कर्णधार राधा यादव, प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर यांच्या अचूक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. याशिवाय जिंतीमणी कलिता आणि मिनू मणी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
राधा यादव : ३ षटके, ११ धावा, ३ बळी.
प्रेमा रावत : ३ षटके, १६ धावा, २ बळी.
सायमा ठाकोर: ४ षटके, १४ धावा, २ बळी.

