

india a vs australia a test series druv jurel kl rahul devdutt padikkal flop
नवी दिल्ली : भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ या संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
सध्या भारताचा टी-20 संघ आशिया चषक स्पर्धा खेळण्यात व्यस्त असला, तरी जे खेळाडू या स्पर्धेत खेळत नाहीत ते देखील मैदानातच आहेत. ऑस्ट्रेलियाचा ‘अ’ संघ सध्या भारत दौऱ्यावर असून, भारतीय ‘अ’ संघाकडून अनेक मोठे आणि अनुभवी खेळाडू त्यांच्याविरुद्ध मैदानात उतरले आहेत. पण त्यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे.
विशेषतः वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेच्या तोंडावर भारतीय फलंदाजांचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे. केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 420 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर केएल राहुल केवळ 11 धावा करून बाद झाला. दुसरा सलामीवीर नारायण जगदीशनने 38 धावांचे योगदान दिले.
भारतीय कसोटी संघात करुण नायरची जागा घेण्याचा दावेदार पडिक्कलला 11 चेंडूत फक्त एक धाव करता आली. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. संघाचे नेतृत्व करणारा ध्रुव जुरेलही केवळ एक धाव करून बाद झाला. नितीश कुमार रेड्डी देखील एकापेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने 13 चेंडू खेळले आणि टॉड मर्फीने त्याला बोल्ड केले. इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्यानंतर नितीशचा हा पहिलाच सामना होता. त्याने पहिल्या डावात फलंदाजी केली नाही. त्याआधी त्याने आठ षटके टाकली होती आणि 16 धावा दिल्या होत्या.
युवा फलंदाज आयुष बदोनीला केवळ 21 धावांची खेळी करता आली. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने अर्धशतक पूर्ण केले आणि तो मैदानात टिकून राहिला, हीच एक समाधानाची बाब होती. त्याच्या योगदानामुळेच भारताने 194 धावांपर्यंत मजल मारली.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ आघाडी घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्या डावात लवकर बाद करावे लागेल, तरच सामन्यात पुनरागमन करणे शक्य होईल.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे 9 फलंदाज 329 धावांवर बाद झाल्यानंतर 400 धावांचा टप्पा पार करतील असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु, तळाच्या फळीतील फलंदाज टॉड मर्फीने 76 धावांची शानदार खेळी करत संघाला 420 धावांपर्यंत पोहोचवले.