

दिनेश कार्तिकने २०२४ च्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, काही महिन्यांनंतर त्याने आपला निर्णय बदलत द. आफ्रिकेतील एसए२० (SA20) लीगमध्ये सहभाग घेतला. २०२५ च्या एसए-२० हंगामात तो पार्ल रॉयल्स संघाचा भाग होता. अशा प्रकारे, तो एसए-२० मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आता २०२६ मध्ये एसए-२० चा पुढील हंगाम २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत खेळला जाईल, ज्यात दिनेश कार्तिक सहभागी होणार नाही.
दरम्यान, दिनेश कार्तिक याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हाँगकाँग सिक्सेस २०२५ मध्ये तो टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. २३ सप्टेंबर रोजी क्रिकेट हाँगकाँग, चायनाने ही माहिती दिली. भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाल्यावर दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘हाँगकाँग सिक्सेससारख्या ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ज्या खेळाडूंचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्यांच्यासोबत मैदानावर उतरण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करून क्रिकेटचा आनंद देणे हे माझे उद्दिष्ट असेल.’
क्रिकेट हाँगकाँग, चायनाचे अध्यक्ष बुरजी श्रॉफ म्हणाले, ‘दिनेश कार्तिकचे टीम इंडियाचा कर्णधार म्हणून स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्याचा अनुभव आणि नेतृत्व या स्पर्धेत विशेष योगदान देईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दिनेशच्या उपस्थितीमुळे जगभरातील क्रिकेट चाहते हा शानदार क्रिकेट महोत्सव पाहण्यासाठी आकर्षित होतील.’
दिनेश कार्तिक हा रॉबिन उथप्पाची जागा घेईल. उथप्पाने गेल्या वर्षी हाँगकाँग सिक्सेसमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. हाँगकाँग सिक्सेस २०२४ मध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. संघ गट-टप्प्यातच दोन्ही सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला होता. भारतीय संघाला पाकिस्तान आणि यूएई (UAE) या दोन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या हंगामात भारतीय संघाचा पाकिस्तानशी सामना होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही संघांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अलीकडेच खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता.
त्याचप्रमाणे, यूएई (UAE) मध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने दोन्ही सामन्यांत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. अशा परिस्थितीत आता चाहत्यांच्या नजरा हाँगकाँग सिक्सेस २०२५ वर लागल्या आहेत.
हाँगकाँग सिक्सेस २०२५ च्या वेळापत्रकाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या वर्षी ही स्पर्धा १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झाली होती, त्यामुळे या वर्षी ती ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला आयोजित केली जाण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले होते.