

अबुधाबी; वृत्तसंस्था : मोहम्मद नवाज (24 चेंडूंत 38) व हुसेन तलत (30 चेंडूंत 32) यांनी सहाव्या गड्यासाठी 58 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर याच बळावर पाकिस्तानने आशिया चषक टी-20 सुपर 4 लढतीत श्रीलंकेचा निसटता पराभव केला. लंकेला 8 बाद 133 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानने 18 षटकांत 5 बाद 138 धावांसह विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेतील अस्तित्व कायम राखले असून दुसरीकडे, येथील पराभवामुळे लंकन संघ अडचणीत आल्याचे अधोरेखित झाले आहे.
या सुपर 4 फेरीत भारताकडून मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर, अंतिम फेरीत स्थान कायम राखण्यासाठी आगाच्या नेतृत्वाखालील संघाला विजय आवश्यक होता. अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजयाचा पाया रचला. मात्र, पाकिस्तानी फलंदाजांनी निर्णायक टप्प्यात जोरदार हल्ला चढवत लंकेच्या प्रयत्नांना लगाम घातला.
पाकिस्तानने या लढतीत श्रीलंकेचा डाव अवघ्या 133 धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने तीन बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. त्याने दोन बळी पॉवरप्लेमध्येच घेतले. असे असतानाही कामिंदू मेंडिसने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले आणि श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
पाकिस्तानचा अबरार व श्रीलंकेचा हसरंगा यांच्यात या लढतीत अप्रत्यक्ष बरीच शेरेबाजी रंगली. एकीकडे, अबरारने विकेट घेतल्यानंतर हसरंगाप्रमाणे सेलिब्रेशन केले, तर प्रत्युत्तरात हसरंगाने दोन बळी घेतल्यानंतर अबरारने मागे ज्याप्रमाणे भारताविरुद्ध सेलिब्रेशन केले होते, त्याचा कित्ता गिरवला आणि ‘हम भी कुछ कम नही’ हेच जणू दाखवून दिले. ही शेरेबाजीच या सामन्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले.