

क्रिकेट जगतातील महान पंच हेरोल्ड 'डिकी' बर्ड यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. बर्ड यांनी त्यांच्या कारकिर्दीत ६६ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. त्यांनी एकूण २६ वर्षांत ३८१ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत ते तीन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये पंच होते. पंच बनण्यापूर्वी त्यांनी काउंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरचे एक प्रमुख फलंदाज होते. काही काळ ते लीसेस्टरशायर संघाचाही भाग होते. त्यांच्या निधनाची बातमी यॉर्कशायर काउंटी क्लबने दिली.
एप्रिल १९३३ मध्ये बार्न्सली येथे जन्मलेल्या बर्ड यांनी १९५६ मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरकडून पदार्पण केले. पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ दिग्गज क्रिकेटपटू ज्योफ बॉयकॉट यांच्यासोबत खेळले होते. त्यांनी ३२ व्या वर्षी खेळातून निवृत्ती घेतली. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले आणि १९७३ मध्ये त्यांनी पंचगिरीच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
बर्ड यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात लीसेस्टरशायरसाठीही खेळले, परंतु दुखापतीमुळे त्यांची कारकीर्द वेळेपूर्वीच संपुष्टात आली. नंतर त्यांनी एक खेळाडू म्हणून जास्त यशस्वी न झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. बर्ड यांनी ९३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २०.७१ च्या सरासरीने धावा केल्या. यामध्ये त्यांनी दोन शतके आणि १४ अर्धशतकांसह ३३१४ धावा केल्या.
यॉर्कशायर काउंटी क्लबने ट्वीट करत म्हटले की, हेरोल्ड 'डिकी' बर्ड यांनी आपल्यामागे खेळभावना, नम्रता आणि आनंदाचा वारसा सोडला आहे. त्यांचे चाहते जगभरात आहेत. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य या दु:खद प्रसंगी डिकी यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहेत. क्लबमधील सर्वजण त्यांना खूप मिस करतील. त्यांनी यॉर्कशायर क्लबसोबत बराच वेळ घालवला आहे. ते आमच्यासाठी इतिहासातील महान व्यक्तींपैकी एक म्हणून नेहमीच आठवणीत राहतील.’
बर्ड यांनी सर्वप्रथम १९७० मध्ये पंचगिरी केली. कसोटीमध्ये त्यांनी १९७३ मध्ये लीड्स येथील यॉर्कशायरच्या घरच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा पंचगिरी केली. पंच म्हणून त्यांचा शेवटचा कसोटी सामना जून १९९६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत यांच्यात होता. त्याच सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी पदार्पण केले होते. दोन्ही संघांमधील तो सामना अनिर्णित राहिला होता. या प्रसंगी खेळाडूंनी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिला आणि जेव्हा ते मैदानाबाहेर आले, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
डिकी बर्ड यांचा भारत आणि वेस्ट इंडिजशी खास संबंध होता. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा बर्ड पंच होते. १९८३ मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, तेव्हाही बर्ड पंच होते. डिकी बर्ड यांचा भारत आणि वेस्ट इंडिजशी खास संबंध होता. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा बर्ड पंच होते. १९८३ मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, तेव्हाही बर्ड हेच पंच होते.