

टीम इंडियाचा (Team India) युवा तडफदार फलंदाज तसेच एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याच्या चाहत्यांसाठी एक नवी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेबाहेर असलेला हा स्टार खेळाडू ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत पुनरागमन करणार का, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गिलच्या दुखापतीसंदर्भात मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, तो आता बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबसाठी दाखल झाला आहे. याचा अर्थ तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे आणि मैदानात परतण्यासाठी सज्ज होत आहे.
'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, शुभमन गिल ९ डिसेंबरच्या आधी पूर्णपणे खेळण्यासाठी फिट होण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, तो १०० टक्के फिट असल्याशिवाय त्याला सामन्यांसाठी संघात स्थान मिळणार नाही, अशीही माहिती मिळत आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या गिलच्या फिटनेस रिपोर्टची टीम मॅनेजमेंट उत्सुकतेने वाट पाहत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. या मालिकेसाठी गिलला संघात संधी मिळते की नाही, हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुर आहेत. स्क्वॉड जाहीर झाल्यावरच या चर्चांवर पूर्णपणे पडदा पडेल आणि चित्र स्पष्ट होईल.
पहिला टी-२० : ९ डिसेंबर : कटक : सायंकाळी ७ वाजल्यापासून
दुसरा टी-२० : ११ डिसेंबर : चंदीगड : सायंकाळी ७ वाजल्यापासून
तिसरा टी-२० : १४ डिसेंबर : धर्मशाला : सायंकाळी ७ वाजल्यापासून
चौथा टी-२० : १७ डिसेंबर : लखनऊ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
पाचवा टी-२० : १९ डिसेंबर : अहमदाबाद : सायंकाळी ७ वाजल्यापासून