IND vs SA ODI : पराभूत होऊनही द. आफ्रिकेचा 'हा' भीम पराक्रम! क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचणारी ठरली पहिली टीम
रांची : भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने (South Africa Cricket Team) रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून 17 धावांनी पराभूत होऊनही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला आहे.
भारतीय फलंदाजांचे 'विराट' आक्रमण आणि धावांचा डोंगर
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 349 धावांचा 'हिमालय' उभा केला. भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत 135 धावांची दमदार शतकी खेळी साकारली. त्याला कर्णधार रोहित शर्मा (57 धावा) आणि केएल राहुल (60 धावा) यांनी अर्धशतके झळकावून उत्तम साथ दिली. त्यांच्या या विस्फोटक फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले गेले. आपल्या दमदार खेळासाठी विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात, तरीही 'ती' झुंज महत्त्वाची
350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत वाईट झाली. त्यांचे सलामीवीर रियान रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांना आपले खातेही उघडता आले नाही, तर कर्णधार एडन माक्ररम केवळ 7 धावा करून बाद झाला. अवघ्या 11 धावांमध्ये 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे आफ्रिकेची हार जवळजवळ निश्चित झाली होती.
मात्र, यानंतर मॅथ्यू ब्रीजट्के (72 धावा), मार्को यानसन (70 धावा) आणि कॉर्बिन वॉश (67 धावा) यांनी अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करत शानदार अर्धशतके झळकावली. त्यांच्या या झुंजार खेळीमुळे आफ्रिकेने 300 धावांचा टप्पा ओलांडला, पण अखेरीस संपूर्ण संघ 332 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि त्यांना 17 धावांनी पराभूत व्हावे लागले.
दक्षिण आफ्रिकेने रचला ऐतिहासिक विक्रम
या पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या नावे एक मोठा विक्रम जमा झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले तीन गडी 15 धावांच्या आत गमावूनही 300 धावांचा टप्पा ओलांडणारा दक्षिण आफ्रिका हा जगातील पहिला संघ ठरला आहे.
यापूर्वी, 2019 मध्ये पाकिस्तानने हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध आपले पहिले तीन गडी केवळ 6 धावांवर गमावून 297 धावांपर्यंत मजल मारली होती.
भारताच्या विजयात गोलंदाजांचा सिंहाचा वाटा
भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनीही आपले महत्त्वाचे योगदान दिले. फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक 4 बळी घेत आफ्रिकेच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. त्याला युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने 3 आणि अर्शदीप सिंहने 2 बळी घेत मोलाची साथ दिली. त्यांच्या भेदक माऱ्यामुळेच भारतीय संघ पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला आणि त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

