

नवी दिल्ली : घरच्या मैदानावर भारतीय कसोटी संघाला येत असलेल्या अपयशाच्या मालिकेने संघातल्या एका महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे, ती म्हणजे क्रमांक 3 च्या फलंदाजीच्या स्थानावर सातत्याने होणारे बदल. गौतम गंभीर यांनी राहुल द्रविड यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून (जुलै 2022 पासून) केवळ 18 कसोटी सामन्यांमध्ये भारताने सात वेगवेगळ्या फलंदाजांना या महत्त्वपूर्ण स्थानावर संधी दिली आहे. या नंबर 3 च्या गोंधळावरून निवड समितीचे धोरण आणि कसोटी क्रिकेटमधील स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 3 हे संघातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते, जेथे राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांनी वर्षानुवर्षे भूमिका यशस्वीरित्या सांभाळली. मात्र, गेल्या एका वर्षात भारताने या स्थानावर शुभमन गिल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, विराट कोहली, करुण नायर, देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल या सात फलंदाजांना आजमावले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत, सलामीवीर नसलेल्या वॉशिंग्टन सुंदरला थेट नंबर 3 वर पाठवल्याने वाद वाढला. या सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि भारताला घरच्या मैदानावर सहा सामन्यांमधील चौथा पराभव पत्करावा लागला. गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने 18 कसोटीत 7 विजय आणि 9 पराभव (2 ड्रॉ) पाहिले आहेत. घरच्या मैदानावर 4 विजय आणि 4 पराभव अशी निराशाजनक आकडेवारी आहे.
गंभीर यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला गिलने नंबर 3 वर फलंदाजी केली, परंतु विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याने कर्णधारपद स्वीकारले आणि तो नंबर 4 वर स्थिरावला. गिलनंतर 5 सामन्यांमध्ये साई सुदर्शनने नंबर 3 सांभाळला, पण कोलकात्याच्या पहिल्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी सुंदरला संधी देण्यात आली. सुदर्शनला वगळल्याबद्दल अनेक माजी खेळाडूंनी टीका केली आहे.
गुवाहाटी येथे उद्यापासून सुरू होणारी दुसरी कसोटी मालिका वाचवण्यासाठी भारतासाठी निर्णायक आहे. कर्णधार शुभमन गिलमानेच्या दुखापतीमुळे खेळणार नाही. त्यामुळे नंबर 3 आणि गिलच्या जागी कोणता फलंदाज खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सततच्या प्रयोगांमुळे संघाच्या स्थैर्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.