IND vs BAN Asia Cup : भारताला सुपर ओव्हरमधील चूक पडली महागात, ‘वाइड’ बॉलवर बांगला देशचा विजय

Asia Cup Rising Stars 2025 Semi Final
IND vs BAN Asia Cup : भारताला सुपर ओव्हरमधील चूक पडली महागात, ‘वाइड’ बॉलवर बांगला देशचा विजय
Published on
Updated on

सुपर ओव्हरच्या नाट्यमय पहिल्या डावात अवघ्या दोन चेंडूत 'ऑल आऊट' झाल्यानंतर भारत 'अ' संघाने दुसऱ्या डावात किमान 'मानसिक खेळ' जिंकण्याचा प्रयत्न केला. भारताचा पराभव निश्चित असला तरी, त्यांनी बांगलादेशला विजयाची ती एक धाव काढू न देण्यासाठी प्राणपणाने झुंज दिली, पण अखेर भारताच्या गोलंदाजाने टाकलेला एक 'वाइड' चेंडूने बांगला देशच्या विजयावर शिक्कामोर्तब करून गेला.

'एक धावे'साठी बांगलादेशलाही करावा लागला संघर्ष

पहिल्या डावात भारत शून्यावर बाद झाल्यामुळे बांगलादेशला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. हे आव्हान कागदावर सोपे असले तरी, क्रिकेटमध्ये 'दबाव' सर्वात मोठा असतो आणि त्याचा अनुभव बांगलादेशलाही आला. भारताने युवा लेग-स्पिनर सुयश शर्मा याच्या हाती चेंडू सोपवला. बांगलादेशकडून यासिर अली आणि झिशान आलम हे सलामीवीर आले.

सुयश शर्माने गोलंदाजीची सुरुवातच धमाकेदार केली. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर टॉस-अप केलेला चेंडू टाकला. विजयाची फक्त एकच धाव हवी असताना यासिर अलीने हा चेंडू लॉन्ग-ऑन दिशेने हवेत खेळला. लांबवर धावत जाऊन रमनदीप सिंहने अत्यंत हुशारीने झेल घेतला. झेल घेताना त्याचे पाय सीमारेषेला स्पर्श करणार नाहीत याची दक्षता त्याने घेतली. झेल जवळजवळ निसटला होता, पण त्याने तो शरीराच्या मदतीने पकडला. अनेक अँगलवरून तपासणी केल्यानंतर हा क्लीन कॅच असल्याचा निर्णय देण्यात आला. अवघ्या एका धावेसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची पहिली विकेट पडल्याने सामन्याचा थरार एका क्षणात वाढला. भारताचे खेळाडू हताश असले तरी, त्यांचा लढवय्यापणा दिसून आला.

कर्णधार अकबर अलीने घेतली सूत्रे हाती

पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली स्वतः मैदानात उतरला. विजयासाठी फक्त एक धाव हवी असतानाही तो अत्यंत शांतपणे खेळपट्टीवर आला. त्याने काही काळ 'फॉरवर्ड डिफेन्स'चा सराव केला आणि नंतर खेळपट्टीवरचे खडे बाजूला केले जणू काही तो कोणत्याही दबावाखाली नाही.

दुसरा चेंडू आणि बांगलादेश विजयी

दोन चेंडूत भारताला पराभूत करणाऱ्या 'सुपर ओव्हर'मध्ये विजयासाठी बांगलादेशलाही दुसऱ्या चेंडूपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सुयश शर्माने पुन्हा एकदा आपली 'गुगली' टाकली, पण यावेळी त्याचा टप्पा चुकला. हा चेंडू लेग-साइडच्या खूप खाली गेला आणि पंचांनी तो 'वाइड' असल्याचे घोषित केले. नियमानुसार 'वाइड' बॉलची धावसंख्या बांगलादेशच्या खात्यात जमा झाली आणि बांगलादेशचा संघ विजयी झाला.

हा 'वाइड' चेंडू टाकताना यष्टीरक्षक जितेशच्या हातून स्टंपिंगची संधी निसटली. जर हा चेंडू स्टंपिंग झाला असता, तर बांगलादेशची दुसरी विकेट पडली असती आणि सामन्यात अजून नाट्य पाहायला मिळाले असते. पण तसे झाले नाही आणि एका अतिरिक्त धावेने बांगलादेशने अत्यंत रोमांचक विजय मिळवला. भारताचा संघ शून्यावर बाद झाला असला तरी, विजयासाठी हवी असलेली ती एक धाव काढण्यासाठी बांगलादेशलाही मोठी मानसिक लढाई लढावी लागली, हे या सुपर ओव्हरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.

रिपॉनचा अचूक 'यॉर्कर', भारताचा डाव दोन चेंडूतच संपला

सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरसाठी नियमानुसार भारताचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यष्टीरक्षक जितेश आणि रमनदीप ही जोडी फलंदाजीला आली, तर बांगलादेशने आपला सर्वात अनुभवी गोलंदाज रिपॉन याच्या हाती चेंडू सोपवला.

पहिला चेंडू : रिपॉनने टाकलेला पहिलाच चेंडू मिडल स्टंपच्या तळाशी अचूक 'यॉर्कर' टाकला. या चेंडूवर जितेशने 'रिव्हर्स-लॅप' मारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला आणि चेंडूने स्टंप उडवले. रिपॉनसाठी ही स्वप्नवत सुरुवात ठरली. जितेशने यॉर्करवर 'क्यूट' शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जो अत्यंत प्रश्नार्थक ठरला, अशी चर्चा समालोचकांमध्ये होती.

दुसरा चेंडू : जितेश बाद झाल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले की, भारताने सूर्यवंशी याला न पाठवता आशुतोष याला फलंदाजीसाठी पाठवले. रिपॉनने आपला आत्मविश्वास कायम ठेवत दुसरा चेंडू ऑफ-स्टंपच्या दिशेने पूर्ण लांबीचा टाकला. आशुतोषने हा चेंडू थेट एक्स्ट्रा-कव्हर दिशेने मारला, पण तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता सोपा झेल पकडला. ही भारताची दुसरी विकेट ठरली.

या दोन चेंडूंतच भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि नियम-नुसार भारताचा डाव संपुष्टात आला. भारताच्या धावफलकावर 0 धावा आणि 2 विकेट्स अशी स्थिती होती.

भारताला १९४ धावांचा पाठलाग करण्यासाठी शेवटच्या २० व्या षटकात ६ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज होती आणि सामना अत्यंत चुरशीचा झाला. षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर एकेरी धाव मिळाल्याने उर्वरित चार चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर आशुतोष शर्मा याने उत्तुंग षटकार ठोकला आणि चौथा चेंडूवर चौकार मारून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, पाचव्या चेंडूवर आशुतोष शर्मा बाद झाला, ज्यामुळे शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज निर्माण झाली. अखेरच्या चेंडूवर हर्ष दुबे याने फटका मारून तीन धावा घेतल्या. या तीन धावांमुळे भारताची धावसंख्या बांगलादेश 'अ' च्या १९४ धावांच्या बरोबरीने आली. हा थरारक सामना टाय झाल्यामुळे आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला.

निराशाजनक १९ वे षटक!

सामना निर्णायक क्षणी असताना भारतासाठी १९ वे षटक अत्यंत निराशाजनक ठरले. या महत्त्वाच्या षटकात भारताला केवळ ५ धावा मिळाल्या. याच षटकात रमणदीप सिंग बाद झाला आणि भारताला पाचवा मोठा धक्का बसला.

१८ वे षटक: दोन चौकारांमुळे धावसंख्येत १० धावांची भर

आवश्यक धावांचा दर वाढत असताना १८ व्या षटकात फलंदाजांनी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. या षटकात दोन महत्त्वाचे चौकार मारले गेले, ज्यामुळे भारताच्या धावसंख्येत १० धावांची भर पडली.

खेळपट्टीवर संघर्ष

कर्णधार जितेश शर्मा बाद झाल्यानंतर भारताचा धावांचा वेग पुन्हा एकदा कमी झाला आहे. निर्णायक क्षणी फलंदाजांना मोठे फटके मारण्यात अडचणी आल्या.

१६ वे षटक : या षटकात एका चौकारासह भारताला केवळ ६ धावा मिळाल्या.

१७ वे षटक : या षटकात एकेरी, दुहेरी धावा आणि एका चौकाराच्या मदतीने भारताच्या धावसंख्येत ८ धावांची भर पडली.

धडाकेबाज, पण निराशाजनक

भारताचा कर्णधार जितेश शर्मा याने १५ व्या षटकात आपली आक्रमक फलंदाजी दाखवत डावाला गती दिली. जितेशने या षटकात दोन उत्तुंग षटकार आणि एक दमदार चौकार ठोकला. मात्र, जोरदार फटकेबाजी करत असताना त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. कर्णधार जितेश शर्माच्या रूपात भारताला हा चौथा धक्का बसला आहे. त्याने आक्रमक खेळी करत धावांचा वेग वाढवला असला तरी, ऐन मोक्याच्या वेळी तो बाद झाला.

धावांचा वेग मंदावल्यानंतर नवीन फलंदाज वढेराने आक्रमक रूप धारण केले आहे. डावाच्या १४ व्या षटकात वढेराने गोलंदाजावर हल्ला चढवत एक उत्तुंग षटकार आणि एक चौकार मारला. त्याच्या या फटकेबाजीमुळे या षटकात भारताच्या धावसंख्येत १३ धावांची भर पडली. वढेराच्या या आक्रमणामुळे मधल्या षटकातील शांतता भंग झाली आहे आणि भारताच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

धावांचा वेग पुन्हा मंदावला

मध्यंतरात संयम : प्रियांश आर्य बाद झाल्यानंतर भारताच्या डावातील धावांचा वेग पुन्हा एकदा मंदावला. मधल्या षटकांमध्ये कर्णधार जितेश शर्मा आणि नेहल वधेरा हे भागीदारीवर लक्ष केंद्रित करताना दिसले. ११, १२ आणि १३ वे षटक भारतासाठी संथ राहिले. यात अनुक्रमे ५, ७, ६ धावा मिळाल्या. या तीन षटकांमध्ये फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाहीत आणि त्यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला.

भारताच्या डावातील दहावे षटक संमिश्र ठरले. या षटकात भारताने आपल्या डावातील शतक पूर्ण करण्याची महत्त्वाची मजल मारली. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या प्रियांश आर्य याला ४४ धावांवर असताना आपला विकेट गमवावा लागला आणि भारताला हा तिसरा मोठा धक्का बसला. प्रियांश आर्यच्या ४४ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताने पहिल्या दहा षटकांत चांगली धावसंख्या उभारली.

प्रियांश आर्यची जोरदार फटकेबाजी! नवव्या षटकात १९ धावा वसूल

९व्या षटकात प्रियांशने धमाका केला. मधल्या षटकांमध्ये धावगती मंदावल्यानंतर प्रियांश आर्य याने नवव्या षटकात जोरदार आक्रमक फलंदाजी केली आणि भारताला पुन्हा ट्रॅकवर आणले. या षटकात प्रियांशने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत एकूण १९ धावा चोपल्या. गोलंदाजी करताना दोन वाईड चेंडू टाकले गेल्याने गोलंदाजांवर दबाव स्पष्ट दिसत होता.

७व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ९७

सातव्या षटकात कर्णधार जितेश शर्मा मैदानात आल्यानंतर आठव्या षटकात भारताच्या धावसंख्येने पुन्हा वेग पकडला. या षटकात फलंदाजांनी एक चौकार मारत आणि एकेरी-दुहेरी धावा घेत एकूण ८ धावा वसूल केल्या. कर्णधार जितेश शर्मा आणि प्रियांश आर्य यांनी सावध आणि आक्रमकतेचा समन्वय साधत भागीदारी वाढवण्यास सुरुवात केली.

नमन धीर चौकार मारून लगेच बाद

भारताला सातव्या षटकात दुसरा मोठा झटका बसला. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नमन धीर याने आत्मविश्वासाने एक चौकार लगावला. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. नमन धीर बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्मा स्वतः मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याने प्रियांश आर्यसोबत उर्वरित चार चेंडूंवर एकेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला आणि पुढील भागीदारीसाठी सुरुवात केली.

७व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ७०

पॉवरप्लेचा शेवट शांत

भारताच्या डावातील सहावे आणि पॉवरप्लेमधील शेवटचे षटक जेमतेम राहिले. या षटकात भारताला केवळ ६ धावा मिळाल्या, ज्यामुळे धावांचा वेग थोडा मंदावला. मागील षटकाप्रमाणेच या षटकातही गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात आली. यानंतर, दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एक धाव मिळाली आणि पाचवा चेंडू निर्धाव गेला. मात्र, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियांश आर्य याने एक उत्कृष्ट चौकार मारत संघासाठी काही महत्त्वाच्या धावा जोडल्या. या षटकातील ६ धावांसह भारताने पॉवरप्लेमध्ये एक मजबूत धावसंख्या उभारली.

६व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ६२

भारताचा धावांचा वेग मंदावला

वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर भारताचा धावांचा वेग पाचव्या षटकात मंदावला. हे षटक भारतासाठी महागडे ठरले. बांगलादेशच्या रिपन मोंडोलने या षटकात अतिशय टिच्चून गोलंदाजी केली आणि फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. पहिल्या चेंडूवर प्रियांश आर्यने एक धाव घेऊन स्ट्राईक नमन धीरला दिले. नमनने दुसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. परंतु यानंतर रिपन मोंडोलने नमन धीरला पूर्णपणे बांधून ठेवले. नमनने उर्वरित चार चेंडू खेळून काढले. ज्यावर एकही धाव मिळाली नाही. या षटकात भारताला केवळ ३ धावा मिळाल्या.

५व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ५६

१९ चेंडूत ५० धावा

भारताने आजच्या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीने शानदार चौकार मारून ही ५० धावांची मजल गाठली. पण, या विक्रमी सुरुवातीनंतर भारताला लगेचच एक मोठा धक्का बसला. चौथ्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूंवर धावा झाल्या नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे, चौथ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी बाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर नमन धीर फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने संयमित खेळ दाखवत उर्वरित दोन चेंडू खेळून काढले. या विकेटमुळे चौथ्या षटकात भारताला फक्त ४ धावा मिळाल्या.

चौथ्या षटकाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ५३

तिसऱ्या षटकातही भारताच्या धावसंख्येत १४ धावांची भर

वैभव सूर्यवंशी सोबत आता प्रियांश आर्यनेही आपला आक्रमक पवित्रा दाखवला आहे. तिसऱ्या षटकात भारताने एकूण १४ धावा वसूल केल्या. पहिल्या दोन चेंडूंवर फलंदाजांनी एकेरी धावा घेतल्या. तिसरा चेंडू निर्धाव गेला. मात्र, यानंतर प्रियांश आर्यने जोरदार फटकेबाजी करत चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग दोन उत्तुंग षटकार खेचले. या षटकात प्रियांशने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताचा धावांचा वेग कायम राहिला आहे. सहावा चेंडू निर्धाव गेला असला तरी, भारताची आक्रमक सुरुवात जोरदार सुरू आहे.

तिस-या षटकाअखेर भारताची धावसंख्या बिनबाद ४९

दुसऱ्या षटकातही १६ धावांची कमाई

वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकातील तुफानी खेळीचा सिलसिला दुसऱ्या षटकातही कायम ठेवला. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला वैभव आणि प्रियांश आर्य यांनी पहिल्या चार चेंडूंवर एकेरी धावा घेत शांतपणे स्ट्राईक रोटेट केले. मात्र, त्यानंतर वैभवने पुन्हा एकदा गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर सलग दोन जबरदस्त षटकार लगावले. या षटकात भारताने एकूण १६ धावा वसूल केल्या. यामुळे भारताची धावसंख्या केवळ दोन षटकांतच बिनबाद ३५ पर्यंत पोहचली.

भारताच्या डावाची सुरुवात धमाकेदार झाली आहे. सलामीला आलेले वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य यांनी मैदानात पाऊल ठेवताच धावांचा ओघ सुरू केला. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच षटकातील गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत संघाला एक मजबूत आणि वेगवान सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतरच्या सलग दोन चेंडूंवर दोन दणदणीत षटकार ठोकले. चौथा चेंडू त्याने खेळून काढला. यानंतर त्याने एक चौकार मारत धावांचा वेग कायम ठेवला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन त्याने पुढील षटकासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवला. वैभवच्या या तुफानी फलंदाजीमुळे भारताने पहिल्याच षटकात १९ धावा जोडल्या आणि सामना सुरु होताच प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला.

बांगलादेशचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये बांगलादेश 'अ' संघाने भारतासमोर (India) १९५ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे. अखेरच्या काही षटकांमध्ये झालेल्या धावांच्या वादळामुळे हा स्कोर इतका मोठा झाला. विशेषतः एस. एम. मेहेरॉब याने केलेल्या अविश्वसनीय फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले.

मेहेरॉबचे १८ चेंडूत ४८ धावांचे तुफानी आक्रमण

सामन्याच्या उत्तरार्धात बांगलादेश ‘अ’ च्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. यात मेहेरॉब याने आपल्या आक्रमक बॅटिंगचा जलवा दाखवला. त्याने केवळ १८ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा कुटल्या, ज्यात त्याने मैदानाच्या प्रत्येक दिशेने चौकार-षटकारांची बरसात केली. त्याच्या या वादळी खेळीमुळे बांगलादेश ‘अ’ संघाला एक मजबूत धावसंख्या उभारता आली.

कर्णधार जितेशचा 'तो' निर्णय ठरला महागात

सामन्याच्या निर्णायक क्षणी भारतीय कर्णधार जितेश याने घेतलेला एक निर्णय संघासाठी महागात ठरला. डावातील १९ वे षटक त्याने नमन धीर याच्याकडे सोपवले. फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला आणि या षटकात तब्बल २८ धावा वसूल केल्या. यानंतर, गोलंदाज वैशाख याच्या अखेरच्या षटकातही २२ धावा कुटल्या गेल्या.

या दोन षटकांमध्ये आलेल्या ५० धावांनी बांगलादेश 'अ' संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत झाली, जे सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात खूपच मोठे आव्हान आहे.

धावसंख्या पाहून जितेशने घेतली 'रणनीती' बैठक

डाव संपल्यानंतर, मोठी धावसंख्या पाहून भारतीय संघाचा कर्णधार जितेश याने मैदानातून बाहेर पडण्यापूर्वी सर्व खेळाडूंना एकत्रित करून एक तातडीची बैठक घेतली. शेवटच्या दोन षटकांमध्ये संघाच्या हातून सामना निसटला होता आणि आता ती निराशा मागे सारून पुढील खेळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, हे त्याने आपल्या सहकाऱ्यांना समजावले. धावांचा डोंगर पार करण्यासाठी भारतीय फलंदाजांना आता आक्रमक आणि संयमी अशा दोन्ही खेळाची गरज आहे.

इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन)

प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नमन धीर, नेहल वढेरा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, रमणदीप सिंग, विजयकुमार विशक, गुर्जपनीत सिंग, सुयश शर्मा

बांगलादेश ए प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश अ (प्लेइंग इलेव्हन) : हबीबुर रहमान सोहन, जिशान आलम, जवाद अबरार, अकबर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), महिदुल इस्लाम अंकन, यासिर अली, एसएम मेहराब, अबू हैदर रोनी, रकीबुल हसन, अब्दुल गफ्फार सकलेन, रिपन मंडोल

वैभव सूर्यवंशीने चालू स्पर्धेत २०१ धावा केल्या आहेत. रायझिंग स्टार्स आशिया कप उपांत्य फेरीत भारत अ संघाच्या आघाडीच्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. अफगाणिस्तान अ संघाला ७८ धावांत गुंडाळणाऱ्या बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. शिवाय, साखळी सामन्यात त्यांनी श्रीलंका अ संघाला शेवटच्या षटकापर्यंत खेळण्यास भाग पाडले होते.

साखळी फेरीत भारताने गट ब मध्ये तीन पैकी दोन सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले, तर दुसरीकडे बांगलादेशने गट अ मध्ये दोन सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले.

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना शुक्रवारी भारत अ आणि बांगलादेश अ संघांमध्ये खेळला जात आहे. भारत अ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news