

ind vs sa 2nd test kagiso rabada ruled out of guwahati test match
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्णधार शुभमन गिल याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला बसलेला मोठा फटका ताजा असतानाच, आता दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही त्यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण खेळाडूंना गमवावे लागले आहे.
गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर शनिवार (२२ नोव्हेंबर)पासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्याच्या एक दिवस आधी आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
कगिसो रबाडा हा केवळ दुसऱ्या कसोटीतूनच नव्हे, तर उर्वरित संपूर्ण दौऱ्यामधून बाहेर पडला आहे. कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने टॉसच्या वेळी रबाडाच्या दुखापतीची माहिती दिली होती.
रबाडा दुसऱ्या कसोटीपूर्वी पूर्णपणे बरा होईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. दक्षिण आफ्रिकेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रबाडा आता मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहील आणि पुढील चार आठवडे त्याला रिहॅबिलिटेशन मध्ये घालवावे लागणार आहेत. त्यामुळे दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर तो तातडीने मायदेशी परतणार आहे.
या कसोटी सामन्यापूर्वी यजमान भारतीय संघालाही मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुभमन गिल हा मानेच्या स्नायूंमध्ये झालेल्या ताणामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे.
एकीकडे गिल आणि दुसरीकडे रबाडा या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना गमवल्यामुळे दोन्ही संघांची गुवाहाटी कसोटीपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आता उर्वरित खेळाडूंवर अधिक दडपण येणार आहे.
रबाडाच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेने आधीच लुंगी एनगिडी याला संघात स्थान दिले आहे. परंतु, कोलकाता कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर आफ्रिकन संघ आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये फारसा बदल करेल, अशी शक्यता कमी आहे.
या कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे.