

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील प्रदीर्घ मालिकेचा बिगुल वाजला असून, पहिला थरारक सामना टीम इंडियाने खिशात घातला आहे. जानेवारी महिन्यात चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवातील दोन सामने अद्याप शिल्लक आहेत. हे सामने नेमके कधी आणि कुठे होणार आहेत, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
भारतीय संघाने वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता केवळ दोन झुंज बाकी आहेत.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना ऐतिहासिक वडोदरा स्टेडियमवर पार पडला. या मैदानातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही संघांनी ३०० धावांचा टप्पा ओलांडल्याने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. आता मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोट येथे खेळवला जाईल. त्यानंतर १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याने या मालिकेची सांगता होईल.
पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. साहजिकच सर्वत्र टी-२० चे वारे वाहत आहेत; मात्र तरीही भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू या मालिकेत खेळत असल्यामुळे वडोदराप्रमाणेच राजकोट आणि इंदूरमध्येही स्टेडियम हाऊसफुल्ल राहण्याची शक्यता आहे.
एकदिवसीय मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज होतील. मात्र, टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल पाहायला मिळतील. एकदिवसीय संघात नेतृत्व शुभमन गिल करत असला, तरी टी-२० मध्ये कप्तानीची धुरा 'मिस्टर ३६०' सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, टी-२० संघात शुभमन गिलचा समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत अनेक युवा खेळाडू आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज असतील.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आयुष बदोनी.