

न्यूझीलंडविरुद्ध रविवारी (दि. ११) पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने विजयी षटकार ठोकून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या एका षटकारासह त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मागे टाकत एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे.
केएल राहुल हा भारतीय संघातील एक अष्टपैलू गुणवैशिष्ट्ये असलेला फलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून त्याने संघासाठी सलामीवीर ते यष्टिरक्षक अशा अनेक भूमिका चोख बजावल्या आहेत. सध्या तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'फिनिशर'ची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात त्याने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसह त्याने विराट कोहलीला पिछाडीवर टाकले असून, आता या यादीत त्याच्यापुढे केवळ माजी कर्णधार एमएस धोनी आहे.
वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने ३०० धावांचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली, मात्र मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ काही काळ अडचणीत सापडला होता. अशा वेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने संयमी खेळ करत परिस्थिती हाताळली. त्याने २१ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याच षटकाराने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये षटकार मारून सामना जिंकवून देणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण ९ वेळा षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला आहे. राहुलने रविवारी सहाव्यांदा ही किमया साधली आणि तो या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ५ वेळा अशी कामगिरी केली असून, तो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
राहुल या मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळत असून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने त्याला अनेकदा 'फिनिशर'ची भूमिका पार पाडावी लागते. रविवारी त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची आगामी टी-२० मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याला स्थान मिळालेले नाही.