

ICC Rankings Virat Kohli Set to Reclaim Top Spot Rohit Sharma Faces Drop
वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय (ODI) क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका निर्माण झाला असून, विराट कोहली पुन्हा एकदा या सिंहासनावर विराजमान होण्याची चिन्हे आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर क्रमवारीची समीकरणे वेगाने बदलली आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने सन २०२६ ची दमदार सुरुवात केली आहे. ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दोन सामने अद्याप शिल्लक असले तरी, दुसऱ्या सामन्यापूर्वीच आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा 'नंबर वन' फलंदाज बनू शकतो, तर रोहित शर्माच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आयसीसीची नवीन अधिकृत क्रमवारी जाहीर झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.
आयसीसीने शेवटची एकदिवसीय क्रमवारी ६ डिसेंबर २०२५ रोजी अपडेट केली होती. त्यानंतर कोणताही एकदिवसीय सामना न झाल्यामुळे क्रमवारीत बदल करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, नवीन वर्षातील पहिल्या सामन्यासह आता खेळाडूंच्या रेटिंगमध्ये बदल होणार आहेत. शेवटच्या अपडेटनुसार, रोहित शर्मा ७८१ रेटिंगसह पहिल्या तर विराट कोहली ७७३ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितने २९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. याउलट, विराट कोहलीने आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी केली. विराटचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याने ९१ चेंडूत ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. विराटने १०२.२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, तर रोहितचा स्ट्राइक रेट ८९.६६ इतकाच राहिला.
जुन्या क्रमवारीनुसार रोहित आणि विराट यांच्यात केवळ ८ रेटिंग गुणांचा फरक होता. ताज्या कामगिरीनंतर हा फरक भरून निघणार असून विराट कोहली ८०० रेटिंग गुणांच्या समीप पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनेही ८४ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे नवीन क्रमवारीत मिचेल दुसऱ्या स्थानावर झेप घेऊन रोहित शर्माची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होण्याची देखील दाट शक्यता आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा दुसरा सामना १४ जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी खेळवला जाणार आहे. योगायोगाने त्याच दिवशी आयसीसी आपली क्रमवारी अपडेट करणार आहे. बुधवारी (दि. १२) जाहीर होणाऱ्या या क्रमवारीत नक्की कोणाचे वर्चस्व राहते, याकडे आता क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.