

ind vs nz odi
वडोदरा : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी हिंदी सक्तीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील राजकारणातील दोन दिग्गज ठाकरे बंधू एकत्रही आले. यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. मात्र आता हाच भाषावाद रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मालिकेतील पहिल्या वन-डे सामन्यात पाहायला मिळाला. समालोचन (कॉमेंट्री) कक्षात माजी क्रिकेटपटू वरुण ॲरॉन आणि संजय बांगर यांच्यात 'राष्ट्रीय भाषे'वरून झालेल्या शाब्दिक चकमक आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे सलामीवीर डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी आक्रमक सुरुवात केली होती. यावेळी यष्टिरक्षक के.एल. राहुल फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला तमिळ भाषेतून सूचना देताना स्टंप माईकमध्ये कैद झाला. सुंदरची मातृभाषा तमिळ असल्याने राहुल त्याला 'वेग कमी करून गोलंदाजी कर' असे तमिळ भाषेत सांगत होता.
यावर समालोचन करताना वरुण ॲरॉन म्हणाला, "वॉशिंग्टनला सूचना अधिक चांगल्या प्रकारे समजाव्यात यासाठी राहुल कदाचित तमिळ भाषेचा वापर करत असावा." मात्र, यावर भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी मस्करीत पण थेट भाष्य केले. ते म्हणाले, "माझा 'राष्ट्रीय भाषे'वर (हिंदी) अधिक विश्वास आहे."
वरुण ॲरॉन: "के.एल. राहुल वॉशिंग्टन सुंदरशी तमिळमध्ये बोलत असावा. तो त्याला वेग कमी करण्यास सांगतोय. संजय भाई, तुम्हाला वाटत नाही का की वॉशिंग्टनला तमिळ जास्त चांगलं समजतं?"
संजय बांगर: "माझा 'राष्ट्रीय भाषे'वर जास्त विश्वास आहे."
वरुण ॲरॉन: "मी असं कुठे म्हणालो की माझा फक्त प्रादेशिक भाषांवर विश्वास आहे?"
संजय बांगर: "हे पहा, त्याने मागचा चेंडू ९२ किमी वेगाने टाकला. त्यामुळे भाषा कोणती आहे हे मला महत्त्वाचं वाटत नाही."
आता हा दोन कॉमेंटेटर (समालोचक)मधील भाषावाद संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मैदानावरील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली. ३०१ धावांचे लक्ष्य भारताने ४९ व्या षटकात गाठले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.