पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांची अष्टपैलू कामगिरी. मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे लॉर्डस मैदानावरील कसोटीत इंग्लंडचा भारताने तब्बल १५१ धावांनी दणदणीत पराभव केला.
कसोटीच्या IND vs ENG पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
इंग्लंडचा एकही भारतीय गोलदाजांसमोर टिकू शकल नाही. ५१.५ षटकात १२० धावा करून सर्व फलंदाज तंबूत परतले.
भारताच्या मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या भक्कम बुरुजांना सुरूंग लावला.
पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवले.
भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
सोमवारी दुपारी उपाहारापर्यंत भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. भारताने सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले.
रॉबिन्सनने त्याला बाद केले. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या स्थानावर येऊन अर्धशतकी भागीदारी केली.
त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले.
डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी तीन तर रॉबिन्सन आणि मोईन अली यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला.
पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली. रूटसमोर भारतीय गोलंदाजांची फारशी डाळ शिजली नाही.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही बळी घेत आला नाही. मात्र, चहापानानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने आपली बाजू बळकट केली.
रूटने आपल्या खेळीत १८ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने ५७ तर रोरी बर्न्सने ४९ धावां केल्या.
या डावात मंहम्मद सिराजने ४ तर इशांत शर्मालाही ३ बळी घेता आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार रुटने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले.
सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने दमदार खेळी करत १२९ धावा केल्या.
त्यामुळे भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. रोहित शर्माने ८३ तर कर्णधार विराट कोहलीनेही ४२ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५ बळी घेतले.