बीड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा ठाम निश्चय भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.
राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, येणारा काळ निवडणुकीचा आहे. स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी वज्रमुठ करा, मेहनत घ्या, संघटन मजबूत करा व निष्ठा ढळू न देता उत्तम काम करा असा कानमंत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना दिला.
बीड येथील माँ वैष्णो पॅलेस येथे भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि समर्थ बूथ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटन मंत्री भाऊराव देशमुख, खा.डॉ. प्रितम मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, आर. टी. देशमुख, रमेश आडसकर, माजी आमदार आदिनाथ नवले, केशवराव आंधळे, मोहन जगताप, उषा मुंडे आदी उपस्थित होते. बैठकीच्या पहिल्या सत्रात खा. प्रितम मुंडे यांनी उदघाटनात्मक मार्गदर्शन केले तर भाऊराव देशमुख यांनी समर्थ बूथ अभियानाचा आढावा घेतला.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे, अनेक निवडणुकीत विजय मिळवून आपण ताकद सिद्ध केली आहे. मंत्रीपदाच्या काळात विकासाची कामे करताना जात- पात, धर्म पाहिला नाही, माणूस पाहिला. मायेच्या भावनेतून सर्वांना स्वतःपेक्षाही जास्त जपले. मी शांत आहे पण याचा अर्थ चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. आज आपण राज्यात विरोधकाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे संघटन मजबूत करा. सध्याचा काळ संघर्षाचा असला तरी जनतेशी चांगला संपर्क ठेवून त्यांची कामे करा. येणारा काळ हा निवडणूकांचा आहे, त्यामुळे स्वतःसाठी नाही तर पक्षाच्या विजयासाठी वज्रमुठ तयार करा असे यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
माझा लढा वंचितासाठी आहे. मराठा-ओबीसी आरक्षणा बरोबरच एससी, एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय देखील ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात विरोधक माझ्या विरोधात अपप्रचार करतात, परंतु आपली भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा निश्चय पंकजा यांनी यावेळी जाहीर केला.
बीड जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या कार्यशाळेत आज मराठा व ओबीसींच्या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. मराठा आरक्षणाचा ठराव रमेश आडसकर यांनी तर ओबीसी आरक्षणाचा ठराव आ. नमिता मुंदडा यांनी मांडला.
पंकजा मुंडे मंत्री असतांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. कोणत्याही जातीचे आरक्षण न काढता हे मिळालं, याचा समाजाला मराठा समाजाला फायदा झाला आणि लोकनेते मुंडे साहेबांचे आरक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले होते, परंतु आताच्या महाविकास आघाडी सरकारमुळे हे आरक्षण रद्द झाल्याने समाजात रोष पसरला आहे. पंकजाताईच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करू असे आडसकर म्हणाले.
आ. नमिता मुंदडा यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रस्ताव मांडताना राज्य सरकार याला जबाबदार असल्याचे म्हटले. ओबीसींना हे आरक्षण पूर्ववत मिळेपर्यंत लढा तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. हे दोन्ही ठराव टाळ्यांच्या कडकडाटात संमत करण्यात आले.
कार्यशाळेत बीड जिल्ह्याचा पूर्वी झालेला विकास आणि सध्याची अवस्था तसेच विद्यमान राज्य सरकारचा भ्रष्टाचारी कारभार' या विषयावर आ. सुरेश धस यांनी राजकीय प्रस्ताव मांडला, त्यास आ. लक्ष्मण पवार यांनी अनुमोदन दिले.
पंकजाताईंच्या सत्तेच्या काळात जिल्हयात मोठया प्रमाणात विकास कामे झाली. कोणत्याही पालकमंत्र्यांच्या काळात आला नाही एवढा निधी जिल्हयाला मिळाला. त्यांनी व खा. प्रितमताईंनी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, जलसंधारण, ग्रामीण रस्त्याची कामे केली. पण आता याऊलट चित्र झाले आहे. केंद्राचा निधी आला पण राज्य सरकारचा येत नाही. विद्यमान पालकमंत्र्यांवर टिका करताना ते म्हणाले, जी कामे होत आहेत, त्यातही भ्रष्टाचार होत आहे. कोरोना संकटात जिल्हयात जनतेची त्रेधातिरपीट उडाली. इंजेक्शन मिळत नव्हते. औषधा अभावी रूग्णांना प्राण गमवावे लागले. पालकमंत्री स्वतःच्या बगलबच्याचे भले करण्यात मशगुल आहेत, त्यांनी जिल्हयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याची टिका त्यांनी केली.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/0C9F33TFAhc