

भारतीय कसोटी संघासाठी सद्यस्थितीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मोठी डोकेदुखी ठरले आहे. एकेकाळी राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या फलंदाजांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघाला अनेकदा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले होते.
द्रविडने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 135 सामने खेळले आणि यादरम्यान 10,000 हून अधिक धावा केल्या. पुजारानेही या स्थानावर 95 कसोटी सामने खेळले. मात्र, या दोघांनंतर भारतीय संघाला एकही असा फलंदाज मिळालेला नाही, जो या स्थानावर सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला आहे. जून 2023 नंतर भारतीय संघाने तिसऱ्या क्रमांकावर 6 फलंदाजांना संधी दिली, परंतु यापैकी कोणीही अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही.
शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर 16 कसोटी सामने खेळून 972 धावा केल्या. या स्थानावर खेळताना तो कधीही सहज दिसला नाही. कर्णधार झाल्यापासून त्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान सोडले असून, तो आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू लागला आहे. त्यानंतर त्याच्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली असून, तो सातत्याने धावा करत आहे.
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने करुण नायर आणि साई सुदर्शन या दोन खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर आजमावले आहे, परंतु हे खेळाडू चांगली कामगिरी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याचे 8 वर्षांनी वरिष्ठ संघात पुनरागमन झाले. त्यामुळे तो चांगली कामगिरी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, निकाल शून्य राहिला आहे. इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्या क्रमांकावर त्याने दोन सामने खेळले असून, चार डावांत मिळून केवळ 111 धावा केल्या आहेत, ज्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.
साई सुदर्शनने इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्या क्रमांकावर एक सामना खेळला, जो त्याचा पदार्पणाचा सामना होता. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 30 धावांची खेळी केली होती.