

Sunil Gavaskar indirect taunt to Jasprit Bumrah
लॉर्ड्सवरील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाईल. हे तेच मैदान आहे, जिथे भारतीय संघाने गेल्या 89 वर्षांपासून आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या सामन्यापूर्वी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, चौथ्या सामन्यात भारतीय संघ जसप्रीत बुमराहला खेळवणार की त्याला विश्रांती देणार?
याच पार्श्वभूमीवर, सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गजाने एक महत्त्वाचे विधान केले आहे. खेळाडू इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आलेले नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सुनील गावस्कर यांनी सोनी स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की, कोणत्याही सुपरस्टार खेळाडूने विश्रांती घेऊ नये. ते येथे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आलेले नाहीत. त्यांच्या या विधानाचा रोख जसप्रीत बुमराहकडे असल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता की, बुमराह या दौऱ्यावर केवळ तीनच कसोटी सामने खेळेल. त्याच्या कार्यभाराचे व्यवस्थापन केले जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पाचही सामने खेळला होता, त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाला होता.
बुमराह सध्याच्या मालिकेत 3 पैकी केवळ 2 सामने खेळला आहे. लीड्स कसोटीत त्याने एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली. त्यानंतर एजबॅस्टन कसोटीत तो खेळला नाही. नुकत्याच लॉर्ड्सवर पार पडलेल्या कसोटीत त्याने पुन्हा एकदा डावात पाच फलंदाजांना तंबूत धाडले. त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली असली तरी तो ज्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला, ते दोन्ही सामने गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली. तर दुसरीकडे, एजबॅस्टनमध्ये तो खेळला नाही, तिथे भारताला विजय मिळाला.
आता मालिकाच पणाला लागली आहे. जर भारतीय संघ मँचेस्टरमध्ये पराभूत झाला, तर इंग्लंड मालिका जिंकेल. त्यामुळे आता बुमराहचे मँचेस्टरमध्ये खेळणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.