

lord's test england cricket team fined for slow over rate icc deducted 2 points
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत भारताचा 22 धावांनी पराभव करून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र तिसऱ्या कसोटीच्या या विजयाला दोन दिवस पूर्ण होण्याआधीच आयसीसीने इंग्लंडला मोठा दणका दिला आहे. लॉर्ड्स कसोटीत षटकांची गती कमी राखल्याबद्दल (स्लो ओव्हर रेट) इंग्लंडवर जबर दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने सामन्याच्या शुल्काच्या 10 टक्के दंड आकारला असून, जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) गुणतालिकेतील त्यांच्या दोन गुणांनाही कात्री लावली आहे. यामुळे इंग्लंडचा संघ WTC गुणतालिकेत एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. टीम इंडिया सध्या या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
या गुण कपातीनंतर, जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत इंग्लंडचे गुण 24 वरून 22 वर आले आहेत. परिणामी, त्यांच्या विजयाची टक्केवारी 66.67 वरून 61.11 झाली आहे. याचा थेट फायदा श्रीलंकेला झाला असून, 66.67 विजयी टक्केवारीसह त्यांनी इंग्लंडला मागे टाकत दुसरे स्थान मिळले आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत त्यांचे तिन्ही सामने जिंकले आहेत. ज्यामुळे त्यांच्या विजयाची टक्केवारी 100 आहे. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 33.33 आहे.
अमिरात आयसीसी एलिट पॅनलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी ही दंडात्मक कारवाई केली आहे. इंग्लंड संघ निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याबद्दल दोषी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार, षटकांची गती कमी राखल्यास, प्रत्येक कमी षटकासाठी खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या शुल्काच्या 5 टक्के दंड आकारण्याची स्पष्ट तरतूद आहे.
तसेच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) नियमांमधील कलम 16.11.2 नुसार, प्रत्येक कमी षटकासाठी संघाचा एक गुण कापला जातो. परिणामी, इंग्लंडच्या एकूण गुणांमधून 2 WTC गुण कमी करण्यात आले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपला गुन्हा आणि शिक्षा मान्य केल्यामुळे, कोणत्याही औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.
उल्लेखनीय आहे की, इंग्लंडला मागील 2023-25 च्या WTC चक्रातही या चुकीचा फटका बसला होता. त्यावेळी षटकांची गती कमी राखल्यामुळे एकूण 26 गुण गमावले होते. आता या नवीन चक्रातही इंग्लंड जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे, ज्याचे गंभीर परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागू शकतात.