

कॅरारा : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टी20 येथे गुरुवारी (दि. 6) खेळवली जाणार असून शुभमन गिलने खेळ उंचावणे यात भारतासाठी विशेष महत्वाचे ठरणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी महत्वाकांक्षी असतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
आतापर्यंतच्या निराशाजनक कामगिरीनंतर शुभमन गिल एका मोठ्या खेळीने पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. येथील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या आघाडीवर थोडीफार चिंता असेल. त्यामुळे त्याचा लाभ भारत पुन्हा एकदा घेणार का, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे.
चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडदेखील उपलब्ध नसेल. आगामी ॲशेसच्या पूर्वतयारीसाठी तो शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत खेळणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचे 2 मुख्य खेळाडू अनुपस्थित असल्याने, मालिकेतील पाचव्या व शेवटच्या अंतिम सामन्यापूर्वी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याची आणि मालिका विजय निश्चित करण्याची भारतासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.
मागील सामन्यात, आठव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू खेळवण्याची भारताची रणनीती यशस्वी ठरली. शिवाय, संघही यामुळे समतोल झाला. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाब असेल ती म्हणजे कर्णधार शुभमन गिलचा फॉर्म. गिलला मागील सहाही सामन्यात अगदी एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
वन डे मालिकेपासून त्याच्या धावसंख्येचा क्रम 10, 9, 24, 37 (नाबाद), 5 आणि 15 असा राहिला आहे. कॅनबेरामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत एक छोटी भागीदारी करतानाच तो लयीत दिसला होता. पण, सीम मुव्हमेंट असल्यास पुढे टाकलेल्या चेंडूंवर गिलला अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि बहुतांश वेळी त्याचा नेहमीचा राजेशाही थाट दिसून आलेला नाही.
दुसरीकडे, अभिषेक शर्माने एका उत्कृष्ट अर्धशतकासह आणि मालिकेत दोन वेगवान सुरुवातींसह जगातील अव्वल क्रमांकाच्या टी-20 फलंदाजाच्या आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. तथापि, आठवडाभरात लगेच कसोटी क्रिकेटकडे वळावे लागणार असल्याने गिलला कोणत्याही स्वरूपात धावा मिळाल्यास निश्चितच आत्मविश्वास मिळेल.
कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दोन चांगल्या सुरुवातींसह आपल्या गतवैभवाची छोटीशी झलक दाखवली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील मालिकेपूर्वी महिनाभराची विश्रांती मिळणार असल्याने, त्यालाही काही धावा आपल्या नावावर करायला आवडतील. या दरम्यान, सूर्यकुमार मुंबईसाठी पुद्दुचेरीविरुद्ध रणजी करंडक सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.
अर्शदीप सिंगच्या समावेशाने गोलंदाजी विभाग अधिक समतोल दिसत आहे. तसेच, कुलदीप यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी परत पाठवण्यात आले आहे. कुलदीप आणि अर्शदीप या दोघांना एकत्र खेळवता येत नाही, ही संघव्यवस्थापनाची अडचण ठरत आली आहे. जर या परिस्थितीत कुलदीप खेळला, तर उत्तम फलंदाजी कौशल्यामुळे हर्षित राणाला संघात स्थान द्यावे लागेल. जेव्हा अर्शदीप खेळतो, तेव्हा त्यांना वॉशिंग्टन सुंदरला संघात समाविष्ट करावे लागते.
ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीत कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. संघात हेड नसल्याने, मार्शसोबत मॅथ्यू शॉर्ट सलामीला येऊ शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियाला गोलंदाजी विभागात काही फेरबदल करण्याची गरज आहे. शॉन बॉट यापूर्वी प्रभावी दिसला नाही. यामुळे, त्याच्या जागी बेन ड्वॉरशुइस किंवा बियर्डमन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), जोश फिलिप (यष्टीरक्षक), मिचेल ओवेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट कुह्नेमन, डम झाम्पा, बियर्डमन, बेन ड्वॉरशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मार्कस स्टॉइनिस.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 1.45 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार