

womens world cup icc team of the tournament harmanpreet kaur dropped
आयसीसीने महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट जगतिक संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. आयसीसी संघाचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड्ट हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. या सर्वोत्कृष्ट संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान मिळवले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासोबतच आयसीसीने स्पर्धा संपताच आपल्या सर्वोत्कृष्ट संघाची घोषणा केली आहे. यात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, विश्वविजेती भारतीय कर्णधार हरमनप्रीतला या संघातून वगळण्यात आले आहे. आयसीसीने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या एकूण १२ खेळाडूंची निवड केली आहे.
यंदाचा महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. आयसीसीने जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात अंतिम सामना खेळलेल्या एकूण सहा महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
विश्वचषक ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय संघातील तीन खेळाडूंनी या संघात जागा मिळवली आहे. यामध्ये सलामी फलंदाज स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे.
इतकेच नव्हे, तर अंतिम सामन्यात भारताकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्याही तीन खेळाडूंना या संघात स्थान मिळवता आले आहे. त्यांची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयसीसी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. लॉरा वोल्वार्ड्टने संपूर्ण स्पर्धेदरम्यान ५७१ धावा केल्या. यादरम्यान तिची सरासरी ७१.३७ अशी राहिली. महिला विश्वचषकाच्या एकाच पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.
उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघातील ॲनाबेल सदरलँड, ॲश्ले गार्डनर आणि लेगस्पिनर अलाना किंग यांचाही संघात समावेश आहे, तर पाकिस्तानची सिद्रा नवाज, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन यांना देखील संघात स्थान मिळाले. तर इंग्लंडचे नॅट सायव्हर-ब्रंट हिला १२वी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
स्मृती मानधनाने यंदाच्या महिला विश्वचषकात एकूण ४३४ धावा केल्या. यादरम्यान तिची सरासरी ५४.२५ इतकी राहिली. तिच्या बॅटमधून एक शतक आणि दोन अर्धशतके झळकली. मानधना ही स्पर्धेत लॉरा वोल्वार्ड्टनंतर दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिच्याव्यतिरिक्त संघात जेमिमा रॉड्रिग्सचे नाव आहे. तिने स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतकासह २९२ धावा केल्या. तिची सरासरी ५८.४० इतकी होती. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रॉड्रिग्सने नाबाद १२७ धावांची शानदार खेळी केली होती. यानंतर तिसरी खेळाडू म्हणजे दीप्ती शर्मा. तिने ३०.७१ च्या सरासरीने २१५ धावा केल्या. तिच्या बॅटमधून तीन अर्धशतके आली, तसेच तिने २०.४० च्या सरासरीने २२ बळी देखील घेतले. या अष्टपैलू कामगिरीमुळे तिची ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड झाली.