

सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान, नुकतीच आयसीसीने नवीन टी-२० गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जोरदार मुसंडी मारली आहे. त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या फॉरमॅटमध्ये पहिले स्थान गाठण्याची त्याची पहिलीच वेळ आहे.
३४ वर्षीय वरुण हा आयसीसीच्या पुरुष टी-२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी टी-२० मध्ये अव्वल गोलंदाज बनण्याची किमया केली आहे.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये पहिल्या दोन सामन्यांमधील त्यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला हे मोठे यश मिळाले आहे. त्याने यूएईविरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत केवळ ४ धावा देऊन १ बळी आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चार षटकांत २४ धावा देऊन १ बळी घेतला. या किफायतशीर कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत तीन स्थानांची वाढ झाली.
यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. आता त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफीला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. मार्चपासून डफी पहिल्या क्रमांकावर होता, परंतु वरुण चक्रवर्तीने आपल्या कौशल्याने भारतीय फिरकी गोलंदाजीची ताकद आजही कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
या क्रमवारीत फिरकीपटूंनी लक्षणीय प्रगती केली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान थुषारा सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा सफियान मुकीम चार स्थानांनी पुढे सरकत ११ व्या क्रमांकावर आला आहे. अबरार अहमद ने ११ स्थानांनी झेप घेत १६ वे स्थान मिळवले, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. भारताचा अक्षर पटेल एका स्थानाने वर चढत १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर कुलदीप यादव ने १६ स्थानांची मोठी प्रगती साधत २३ वे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानच्या नूर अहमदने आठ स्थानांनी प्रगती करत २५ व्या स्थानावर मजल मारली आहे.
आशिया चषक २०२५ मध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या अप्रतिम प्रदर्शनाने फलंदाजी क्रमवारीत आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. यूएईविरुद्ध १६ चेंडूंमध्ये ३० धावा आणि पाकिस्तानविरुद्ध १३ चेंडूंमध्ये ३१ धावांच्या झंझावाती खेळीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता अव्वल १० फलंदाजांमध्ये अभिषेकसह एकूण तीन भारतीय फलंदाज आहेत. तिलक वर्मा दोन स्थानांनी घसरून चौथ्या क्रमांकावर, तर सूर्यकुमार यादव एका स्थानाने खाली येत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अभिषेकने या शानदार कामगिरीच्या जोरावर एकूण ५५ रेटिंग आपल्या खात्यात जमा केले होते. आता त्याचे एकूण रेटिंग ८८४ झाले आहे. या अप्रतिम फॉर्मसह त्याने फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.