

इस्लामाबाद : भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल अपमानास्पद शब्द वापरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने एक नवा वाद निर्माण केला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान-प्रायोजित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केल्याने दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंधांमध्ये कटुता वाढली असतानाच, आता क्रिकेटच्या जगातही एक नवा वाद उफाळला आहे.
एका वाहिनीवरील पॅनेल चर्चेदरम्यान युसूफने भारताच्या हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयावर आपले मत मांडले. तेव्हा त्याने भारताचा कर्णधार सूर्यकुमारबद्दल अपमानास्पद शब्द वापरले.
‘समा टीव्ही’च्या थेट प्रक्षेपणादरम्यान युसूफ म्हणाला, भारत त्यांच्या फिल्मी दुनियेतून बाहेर पडू शकत नाही. त्यांचा कर्णधार, सुआरकुमार यादव... तेव्हा निवेदकाने त्याला सुधारत सांगितले, त्याचे नाव सूर्यकुमार यादव आहे. यावर युसूफ म्हणाला, हो, मी तेच म्हणालो, ‘सुआर’कुमार यादव.
वास्तविक, पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर संतप्त आहेत, कारण १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यादरम्यान सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. टॉसवेळी आणि सामन्याच्या शेवटीही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंपासून अंतर राखले.
यासाठी पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरले होते आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. पीसीबीने आयसीसीकडेही याची तक्रार केली होती. तसेच जर पायक्रॉफ्ट यांना हटवले नाही, तर बुधवारी (१७ सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचा सामना खेळणार नाही आणि आशिया चषकावर बहिष्कार टाकू, अशी पोकळ धमकी दिली होती.
पायक्रॉफ्ट यांच्यामुळेच भारतीय संघाने हस्तांदोलन केले नाही, असा पीसीबीचा आरोप होता. मात्र, आयसीसीने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. आयसीसीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पीसीबीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.