

आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू असून, त्यात दररोज सामने होत असल्याने टी-२० क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र, भारतीय खेळाडू तिलक वर्मा आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांना फटका बसला आहे.
आयसीसीच्या टी२० क्रमवारीत भारताचा अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ३१ धावांच्या प्रभावी खेळीचा त्याला फायदा झाला असून, त्याचे रेटिंग ८८४ झाले आहे. अभिषेक शर्माने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याचदरम्यान, इंग्लंडच्या फिल सॉल्टने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती शतक झळकावले होते. या खेळीमुळे त्याला क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून, तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. फिल सॉल्टचे रेटिंग ८३८ झाले आहे.
इंग्लंडचा जॉस बटलर आता आयसीसी टी-२० क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानेही चांगली फलंदाजी केली होती. बटलरचे रेटिंग ७९४ झाले आहे. दुसरीकडे, भारताचा तिलक वर्मा दोन स्थानांनी घसरून थेट चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग ७९२ आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेचा पथुम निसंका एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याचे रेटिंग ७५१ झाले आहे.
भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग आता ७४७ आहे. एकेकाळी त्याचे रेटिंग ९१२ होते, मात्र आता ते खूपच खाली आले आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट आठव्या आणि श्रीलंकेचा कुसल परेरा नवव्या क्रमांकावर आहे. टिम डेव्हिड ६७६ रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.