

मुंबई : अपोलो टायर्स (Apollo Tyres) भारतीय क्रिकेट संघाचा नवा जर्सी स्पॉन्सर बनला आहे. बीसीसीआयने (BCCI) ‘ड्रीम११’ (Dream11) सोबतचा करार रद्द केल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. देशात ऑनलाइन जुगारावर (Online betting) बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर बीसीसीआयने ‘ड्रीम११’सोबतचा करार संपुष्टात आणला होता. त्यानंतर अपोलो टायर्सने स्पॉन्सरशिपसाठी यशस्वी बोली लावली. हा करार २०२७ पर्यंत चालणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी स्पॉन्सर कोण होणार, यावरचा पडदा आता हटला आहे. अधिकृतपणे अपोलो टायर्स भारतीय संघाचा जर्सी स्पॉन्सर बनला आहे. केंद्र सरकारने सट्टेबाजी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बीसीसीआयने ‘ड्रीम११’ सोबतचा करार रद्द केला होता. त्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोली प्रक्रियेत अपोलो टायर्सने बाजी मारत बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी ४.५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला, जो ‘ड्रीम११’ने पूर्वी देऊ केलेल्या ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा नवीन करार २०२७ पर्यंत चालेल.
या करारानंतर भारतीय संघाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचा लोगो दिसेल. उद्योग जगतातील तज्ज्ञांच्या मते, या करारामुळे भारतीय संघाला अधिक चांगला पाठिंबा मिळणार असून अपोलो टायर्सच्या ब्रँड मूल्यालाही नवीन उंची गाठता येईल. सध्या भारतीय पुरुष संघ आशिया चषकात स्पॉन्सरशिवाय खेळत आहे आणि महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही स्पॉन्सरशिवाय खेळत आहे.
ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातल्यामुळे ‘ड्रीम११’ ने आशिया चषक स्पर्धेपूर्वी पुरुष आणि महिला संघांसाठीची स्पॉन्सरशिप संपुष्टात आणली. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने जर्सी स्पॉन्सरसाठी बोली लावण्यासाठीची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार गेमिंग, सट्टेबाजी, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्या यांना बोली लावण्यास बंदी घातली. शिवाय, क्रीडा-वस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्या, बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांनाही बोली प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. तर कोल्ड्रिंक्स, पंखे, मिक्सर-ग्राइंडर, कुलूप आणि विमा कंपन्यांनाही बोली प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले होते. कारण, या कंपन्यांची उत्पादने बीसीसीआयच्या इतर स्पॉन्सर्सशी जोडलेली आहेत.
जुलै २०२३ मध्ये ‘ड्रीम११’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) ३५८ कोटी रुपयांचा करार केला होता. त्यानुसार, ‘ड्रीम११’ला भारतीय महिला संघ, पुरुष संघ, १९ वर्षांखालील संघ आणि ‘इंडिया ए’ संघाच्या किटसाठी स्पॉन्सरशिपचे हक्क मिळाले होते. त्या वेळी ‘ड्रीम११’ने ‘बायजू’ची (Byju’s) जागा घेतली होती.
‘ड्रीम११’ने इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL) मोठी गुंतवणूक केली होती. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना त्यांनी ब्रँड ॲम्बेसेडर बनवले होते. २०१० मध्ये ‘ड्रीम११’ आयपीएलच्या ट्रॉफीचाही स्पॉन्सर होता. ‘ड्रीम११’ कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL)ची देखील अधिकृत फँटसी पार्टनर आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या ‘सुपर स्मॅश’चे टायटक स्पॉन्सरही त्यांच्याकडे आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगशीही (पुरुष आणि महिला दोन्ही) त्यांचा संबंध राहिला आहे. २०१८ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबतही (ICC) भागीदारी केली होती.