

दुबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या धामधुमीत आयसीसीने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत एका पाकिस्तानी खेळाडूने मोठी झेप घेतली असली, तरी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाकला मोठा फटका बसला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने पाकच्या सईम अयूबला मागे टाकत पुन्हा एकदा जगातील 'नंबर-१' टी-२० अष्टपैलू होण्याचा मान मिळवला आहे.
कोलंबो येथे ओमानविरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात सिकंदर रझाने चेंडू आणि बॅट अशा दोन्ही आघाड्यांवर मोलाचे योगदान दिले. त्याने ४ षटकांत केवळ १७ धावा देत १ बळी टिपला. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसी क्रमवारीत एका स्थानाची झेप घेत पाकिस्तानच्या सईम अयूबला दुसऱ्या स्थानी ढकलले आहे. रजा यापूर्वीही गेल्या वर्षाअखेरपर्यंत अव्वल स्थानी होता.
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेविरुद्ध ७३ धावांची तुफानी खेळी केल्यामुळे फरहानने चार स्थानांची प्रगती करत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. साहिबजादा (७६९ रेटिंग पॉइंट्स) आता भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माच्या (९०८ रेटिंग पॉइंट्स) 'नंबर-१' च्या खुर्चीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे, इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर जोस बटलरची एका स्थानाने घसरण होऊन तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप-१० फलंदाजांमध्ये अभिषेक शर्माव्यतिरिक्त तिलक वर्मा (५ व्या स्थानी) आणि सूर्यकुमार यादव (७ व्या स्थानी) हे भारतीय खेळाडू सामील आहेत.
भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती ७७३ रेटिंग पॉइंट्ससह गोलंदाजांच्या क्रमवारीत आजही अव्वल स्थानी विराजमान आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा अबरार अहमद (७५३ पॉइंट्स) त्याच्याशी कडवी झुंज देत आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर पोहोचला असून, भारताच्या अर्शदीप सिंगने ३ स्थानांची प्रगती करत ११ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
अभिषेक शर्मा (भारत)
फिल सॉल्ट (इंग्लंड)
साहिबजादा फरहान (पाकिस्तान)
जोस बटलर (इंग्लंड)
तिलक वर्मा (भारत)