T20 World Cup 2026 : संजू सॅमसनचे नशीब पुन्हा पालटणार, टी-२० विश्वचषक सामन्यासाठी देणार सलामी

Sanju Samson comeback : दिल्लीत रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज
T20 World Cup 2026 : संजू सॅमसनचे नशीब पुन्हा पालटणार, टी-२० विश्वचषक सामन्यासाठी देणार सलामी
Published on
Updated on

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत विरुद्ध नामिबिया सामन्यात संजू सॅमसन भारतीय डावाची धुरा सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे. या सामन्यात तो इशान किशनसोबत सलामीला येऊ शकतो, मात्र याबाबत अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

संजू सॅमसनचे नशीब आता पुन्हा पालटणार असे चिन्हे दिसत आहेत. भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये (Playing XI) त्याला आणखी एक संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या पुढील आव्हानासाठी सज्ज होत असला तरी, सध्या संघ काही अडचणींचा सामना करत आहे. काही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे समजते, अशा परिस्थितीत सॅमसनला नशिबाची साथ मिळू शकते.

१२ फेब्रुवारीला दिल्लीत भारत विरुद्ध नामिबिया सामना

टी-२० विश्वचषकात भारतीय संघ आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. दरम्यान, भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. पोटाच्या विकारामुळे तो पुढील सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिषेकच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून संजू सॅमसनचे संघात पुनरागमन होऊ शकते. तसे झाल्यास, इशान किशन आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसतील. मात्र, अभिषेकच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कर्णधार सूर्या स्पष्टता देण्याची शक्यता

भारत विरुद्ध नामिबिया सामन्याच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी कर्णधार सूर्यकुमार यादव प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. यावेळी तो अभिषेक शर्माच्या प्रकृतीबाबत आणि त्याच्या खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. नामिबियाविरुद्धचा सामना तुलनेने सोपा असल्याने, अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याला विश्रांती देण्याचा विचार व्यवस्थापन करू शकते. संजू सॅमसनसाठी ही मोठी धावसंख्या उभारण्याची उत्तम संधी असेल. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला होता.

इशान किशनच्या कामगिरीमुळे सॅमसन पिछाडीवर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जेव्हा विश्वचषकासाठी संघ जाहीर केला होता, तेव्हा संजू सॅमसन हा सलामीवीर आणि यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पहिली पसंती होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सॅमसनला आपली छाप पाडता आली नाही, तर दुसऱ्या बाजूला इशान किशनने झंझावाती फलंदाजी करत आपली जागा पक्की केली. परिणामी, इशान आता नियमित सलामीवीर झाला असून सॅमसनला 'बॅकअप' खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे. आता या संदर्भात भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव काय अंतिम निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news