

Virat Kohli ICC ODI Rankings Update: आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट कोहलीला धक्का बसला आहे. कोहलीच्या नंबर-1 वनडे फलंदाजाची जागा आता गेली असून, त्याच्या जागी न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल अव्वल स्थानावर आहे. डॅरिल मिचेलने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत जोरदार कामगिरी केली होती. त्याच जोरावर त्याने रँकिंगमध्ये मोठी झेप घेत नंबर-1 स्थान पटकावलं आहे.
भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत डॅरिल मिचेलने एकूण 352 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये वाढ झाली आणि त्याला थेट नंबर-1ची जागा मिळाली.
नव्या रँकिंगमध्ये डॅरिल मिचेल 845 रेटिंग पॉइंट्ससह नंबर-1 वनडे फलंदाज ठरला आहे. त्याच्या पॉइंट्समध्ये 51 गुणांची वाढ झाली आहे. मागील रँकिंगमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
विराट कोहलीने नुकताच रोहित शर्माला मागे टाकत नंबर-1 स्थान मिळवलं होतं. विशेष म्हणजे, जुलै 2021 नंतर कोहली पहिल्यांदाच वनडे रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचला होता.
मात्र केवळ एका आठवड्यातच त्याचं नंबर-1 स्थान गेलं आणि तो आता नंबर-2 वर आला आहे. विराटचे रेटिंग पॉइंट्स मात्र 795 इतके आहेत.
विराटसाठी हा धक्का असला तरी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्टही आहे. आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये टॉप-5 मध्ये 3 भारतीय फलंदाज आहेत.
विराट कोहली – क्रमांक 2
रोहित शर्मा – क्रमांक 4
शुभमन गिल – क्रमांक 5
केएल राहुलनेही रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. तो 11व्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर 10व्या क्रमांकावरून 11व्या स्थानावर घसरला आहे.
विराट कोहलीचा नंबर-1चा मुकुट एका आठवड्यात गेला असून, डॅरिल मिचेल आता वनडेत नंबर-1 फलंदाज ठरला आहे. मात्र भारतीय संघाचे तीन फलंदाज टॉप-5 मध्ये असल्याने भारताचा दबदबा अजूनही कायम आहे.