

India vs New Zealand T20
नागपूर: नागपूर वर्धा रोडवरील जामठा स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेटचा थरार रंगणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमचे हिरवेगार मैदान आणि लखलखते स्टेडियम या सामन्यासाठी सज्ज झाले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळे पार्किंग, फिडर बसेसची पूर्वतयारी केली असून अधिकाधिक मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यासाठी सुमारे ५० हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात तिकिटांचा काळाबाजार अजूनही सुरू आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जामठ्यातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमपासून सुमारे एक ते दीड किलोमीटर आधीच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यासाठी नकाशाही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या स्टेडियममध्ये ४५ हजार प्रेक्षक बसू शकतात. याशिवाय स्टेडियम बाहेर पाच हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. संध्याकाळी सात वाजता भारत–न्यूझीलंड दरम्यान टी-२० सामना सुरू होणार असून, प्रेक्षकांसाठी स्टेडियमची प्रवेशद्वारे दुपारी चार वाजता खुली होणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी लवकर स्टेडियममध्ये पोहोचावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय चंद्रपूर, वर्धा रोडवरून नागपुरात येणाऱ्या वाहन चालकांनी सामना सुरू होण्यापूर्वी सायंकाळी ५ ते ७ आणि रात्री ११ वाजता सामना संपल्यावर हा मार्ग टाळावा, असेही आवाहन केले आहे.