Rohit-Virat : रोहित-विराटच्या कमबॅकची करावी लागणार प्रतिक्षा, हिटमॅन-किंग पुन्हा कधी मैदानात उतरणार? जाणून घ्या तारीख

Rohit Sharma and Virat Kohli : दोन्ही स्टार खेळाडूंचे मैदानावर पुनरागमन कधी होणार, याकडे आता चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
virat kohli rohit sharma odi
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे सामने अविरतपणे सुरू राहणार असले, तरी टीम इंडियाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आगामी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहणार आहेत. या दोन्ही स्टार खेळाडूंचे मैदानावर पुनरागमन कधी होणार, याकडे आता चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका रविवारी संपली. यासह विराट आणि रोहित यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाच्या केवळ एकदिवसीय संघाचा भाग असल्याने आता ते विश्रांती घेतील. आगामी टी-२० मालिकेत हे दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानात दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांचे पुढचे आंतरराष्ट्रीय सामने कधी असतील, हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

गिलसह वरिष्ठ खेळाडूंना टी-२० मालिकेतून विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता उभय संघांत ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२०मधून निवृत्ती घेतल्याने ते संघाचा भाग नाहीत. विशेष म्हणजे, एकदिवसीय मालिकेचा कर्णधार शुभमन गिल यालाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. टी-२० मालिकेचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

यानंतर फेब्रुवारी महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक पार पडणार असून, रोहित आणि कोहली या स्पर्धेतही खेळताना दिसणार नाहीत. मार्चमध्ये विश्वचषक संपल्यानंतर लगेचच 'आयपीएल'चा (IPL) थरार सुरू होईल. आयपीएलमध्ये मात्र रोहित-विराट हे दोन्ही दिग्गज आपापल्या संघांचे प्रतिनिधित्व करताना मैदानात उतरतील.

जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची शक्यता

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता, भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. १ ते ११ जुलै दरम्यान टी-२० मालिका पार पडेल, ज्यामध्ये वरिष्ठ खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, १४ जुलै पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे मैदानावर पुनरागमन होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

२०२७ च्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मालिका

संघाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी रोहित आणि विराट यांनी या मालिकेतून माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचा या दोन्ही खेळाडूंचा मानस असल्याचे दिसते. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची किंवा मालिका वगळण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची ही मालिका अत्यंत कळीची ठरेल.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

  • पहिला एकदिवसीय सामना : १४ जुलै

  • दुसरा एकदिवसीय सामना : १६ जुलै

  • तिसरा एकदिवसीय सामना : १९ जुलै

रोहित आणि विराटचे चाहते त्यांना आगामी काळात नक्कीच मिस करतील, परंतु या प्रदीर्घ विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news