

icc odi rankings kohli jumped up to no 2 rohit hold the number 1 position
दुबई : आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत मोठा बदल झाला असून, भारतीय चाहत्यांसाठी ही एक रोमांचक बातमी आहे. आपल्या तुफान फॉर्ममुळे माजी कर्णधार विराट कोहलीने थेट दोन स्थानांची झेप घेत, पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या रोहित शर्माला कडवे आव्हान उभे केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत विराट कोहलीने केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा त्याला थेट आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत झाला आहे. असे असले तरी रोहित शर्मा (रेटिंग 782) अजूनही पहिल्या क्रमांकावर आपला कब्जा राखून आहे. त्याच्या पाठोपाठ आता किंग कोहली (रेटिंग 773) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या दोन दिग्गजांमध्ये आता फक्त 9 रेटिंगचा फरक राहिला आहे. त्यामुळे ‘हिटमॅन’ला आपले सिंहासन टिकवून ठेवण्यासाठी पुढील सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे.
विराट कोहलीच्या या झेपेमुळे न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (766) तिसऱ्या तर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान (764) चौथ्या स्थानावर घसरले आहेत. भारताचा शुभमन गिल पाचव्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर कायम आहेत. विशेष म्हणजे, भारताचा श्रेयस अय्यर आता दहाव्या स्थानावर आहे.
भारतीय संघ आता या वर्षी कोणताही वनडे सामना खेळणार नाही. मात्र, पुढील वर्षी म्हणजेच २०२६ सुरू होताच जानेवारीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. यात रोहित आणि विराट पुन्हा एकदा समोरासमोर असतील. या मालिकेनंतर क्रमवारीत पुन्हा एकदा मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.